India Vs England 4th Test Match : ऋषभ पंत वेदनेत; मैदानात झालेल्या दुखापतीमुळे  हॉस्पिटलमध्ये केलं दाखल

India Vs England 4th Test Match : ऋषभ पंत वेदनेत; मैदानात झालेल्या दुखापतीमुळे हॉस्पिटलमध्ये केलं दाखल

मँचेस्टर कसोटीत भारताच्या यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे मैदानावर एकच खळबळ उडाली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

मँचेस्टर कसोटीत भारताच्या यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे मैदानावर एकच खळबळ उडाली आहे. इंग्लंडचा जलद गोलंदाज ख्रिस वोक्स याच्या एका वेगवान चेंडूचा सामना करताना पंतने धोकादायक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, तोच त्याच्या पायावर बसला. ही घटना सामन्याच्या पहिल्याच दिवशी घडली.

चेंडू थेट पायावर आदळल्यामुळे पंतला तीव्र वेदना झाल्या आणि लगेचच त्याला वैद्यकीय मदत देण्यात आली. डॉक्टरांनी निरीक्षण केलं असता, त्याच्या मोज्यांमधून रक्तस्त्राव होत असल्याचं दिसून आलं. त्यानंतर त्याला तातडीने मैदानाबाहेर नेण्यात आलं. पायाला सूज आणि रक्तस्राव असल्याने त्याची स्थिती गंभीर असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले.

प्राथमिक उपचारांसाठी पंतला मँचेस्टर स्टेडियममधील वैद्यकीय केंद्रात हलवण्यात आलं. मात्र तिथे पुढील तपासण्या शक्य नसल्याने त्याला थेट रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचवेळी भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलदेखील रुग्णालयात त्याची भेट घेण्यासाठी दाखल झाला.

या घटनेचे काही व्हिडीओ क्लिप्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. ज्यात पंतला स्ट्रेचरवर नेताना दिसून येत आहे. आता त्याच्या स्कॅन रिपोर्टची प्रतीक्षा असून त्यानंतर पुढील उपचार आणि सामन्यातील सहभागाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

बीसीसीआयने देखील एक्स पोस्ट करत याबाबत माहिती दिली, "ऋषभ पंतला मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी फलंदाजी करताना उजव्या पायावर चेंडू लागला. त्यानंतर त्याला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे." सध्या संपूर्ण संघ व्यवस्थापन आणि चाहत्यांचे लक्ष ऋषभ पंतच्या तब्येतीकडे लागले आहे. या दुखापतीमुळे भारताच्या कसोटी संघात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा

India Vs England 4th Test Match : ऋषभ पंत वेदनेत; मैदानात झालेल्या दुखापतीमुळे  हॉस्पिटलमध्ये केलं दाखल
Shri Vaibhav Lakshmi Vrat : 'या' श्रावणात करा वैभव लक्ष्मीमातेचं व्रत; सुख-समृद्धीसह होईल धनप्राप्ती
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com