दिशा सालियनच्या वडिलांची हायकोर्टात धाव; आदित्य ठाकरेंवर आरोप, रोहित पवार म्हणाले...
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आता दिशा सालियन प्रकरणाची पुन्हा चौकशी करा असं म्हणत दिशाचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची एनआयए चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका सतीश सालियन यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे.
दिशावर सामूहिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप दिशा सालियनच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंसारख्या अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली करण्यात यावा, अशी मागणी सतीश सालियन यांनी केली असून याचिकेत आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरिया यांच्यासह मुंबई पोलीसांवर गंभीर आरोप केला असून किशोरी पेडणेकरांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप देखील दिशाच्या वडिलांनी केला आहे.
याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, "कुठल्याही व्यक्तीने आपल्या मुलीसाठी, स्वत:साठी एखाद्या महिलेसाठी न्याय मागण्याचा जर त्याठिकाणी प्रयत्न केला असेल तर आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की, त्या व्यक्तीला न्याय तिथे मिळाला पाहिजे. पण न्याय मागत असताना त्याच्यामध्ये नेमकं काय घडलं. हेसुद्धा लोकांना कळलं पाहिजे. कारण 4 वर्षापूर्वी की, सुशांत सिंहचे सुसाईड झालं होते आणि दिशा सालियन यांच्यासोबत जी घटना घडली होती त्यावेळेस त्यांच्या आईवडिलांनी वेगळं वक्तव्य केलं होते. कदाचित 4 वर्षानंतर त्यांना वाटत असेल की, न्याय मिळावा म्हणून ते कोर्टात गेले असतील."
"आजपासून पुढे काही दिवस भाजपाकडून याचं वेगळ्या पद्धतीने राजकारण केलं जाईल. कारण भाजप जेव्हा राजकारण करतं तेव्हा त्याच्यामागे काहीतरी हेतू असतो. जेव्हा बिहारची निवडणूक होती. तेव्हा सुशात सिंह ज्याने सुसाईड केलं होते त्याचं बिहारच्या निवडणुकीत भाजपाकडून मोठ्या प्रमाणात राजकारण केलं गेले. आजपासून भाजपवाले यावर बोलायला सुरुवात करतील आणि 4 महिन्यानंतर बिहारची निवडणूक आहे."
"आदित्य ठाकरेचं नाव घेतलं गेलं आहे पण मी आदित्य ठाकरेंना फार जवळून ओळखतो. याच्यामध्ये किती काही केलं तरी आदित्य ठाकरेंचे नाव जुळू शकत नाही. याच्याशी आदित्य ठाकरेचे काही देणंघेणं नाही. भाजप आता औरंगजेबला विसरुन आता या प्रकरणाला मोठं करण्याचा प्रयत्न करेल. याचामागे फक्त राजकारण असेल." असे रोहित पवार म्हणाले.