Rohit Pawar : "वादग्रस्त विधानं करणं थांबवलं पाहिजे, अन्यथा अशा महाभागांना मराठी माणूस जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही"
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका मुलाखतीमध्ये बोलताना अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून राजकीय वर्तुळातून देखील अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, अडगळीत पडलेल्या एका अभिनेत्याने चर्चेत येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अश्लाघ्य विधान केलं नाही ना? तसं नसेल तर या विधानामागील हेतू आणि सडका मेंदू कुणाचा आहे हे शोधणं गरजेचं आहे. काही वेडपट माणसं छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महाराष्ट्रातील महान व्यक्तिमत्त्वांविषयी चुकीची विधानं कुणाच्या आशीर्वादाने करतात?
यासोबतच ते पुढे म्हणाले की, महापुरुष हे केवळ महाराष्ट्रातील व्यक्तींसाठी नाही तर सर्वांसाठीच पूजनीय आहेत, त्यामुळं त्यांच्याविषयी वादग्रस्त विधानं करणं थांबवलं पाहिजे, अन्यथा अशा महाभागांना मराठी माणूस जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही... असे रोहित पवार म्हणाले.