RSS On Language Row : 'स्थानिक भाषेला प्राधान्य द्या'; भाषा वादावर RSS ची पहिली प्रतिक्रिया
महाराष्ट्रात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय हालचालींना गती मिळाली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही यावेळी एकत्र आले असून, त्यांच्या या एकतेनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ही भूमिका भारतीय जनता पक्षासाठी चिंतेची बाब ठरू शकते.
RSS ने भाषाविषयक वादावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. आरएसएसचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले की, "संघाचा कायमचा दृष्टिकोन असा आहे की, भारतातील सर्व भाषा या राष्ट्रीय आहेत. प्रत्येक राज्यातील नागरिकांनी आपल्या स्थानिक भाषेत शिक्षण घेणं हेच योग्य आहे. स्थानिक भाषेला प्राधान्य मिळालं पाहिजे." महाराष्ट्रात सध्या भाषेच्या मुद्द्यावरून तापलेलं वातावरण पाहता, ही भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, राज्य सरकारने प्राथमिक शिक्षणात लागू करण्यात आलेल्या हिंदी सक्तीचे आदेश मागे घेतले आहेत. या निर्णयाला मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या दोन्ही पक्षांनी कडाडून विरोध केला होता. त्यामुळे मराठी भाषेच्या बाजूने भूमिका घेणाऱ्या पक्षांमध्ये एकजूट पाहायला मिळत आहे.
याचदरम्यान, RSS ची अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक देखील पार पडली. देशभरातून आलेल्या प्रचारकांनी विविध मुद्द्यांवर आपली मते मांडली. मणिपूरमधील शांततेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवरही सकारात्मक चर्चा झाली. संघाचे 17,609 स्वयंसेवक प्रशिक्षण पूर्ण करून कार्यरत झाले असून, देशभरात सामाजिक सौहार्द वाढवण्यासाठी 1 लाखांहून अधिक ठिकाणी बैठका घेतल्या गेल्या आहेत. RSS च्या या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील भाषाविषयक राजकारणात नव्या चर्चेला वाव मिळण्याची शक्यता आहे.