Bill Gates : सीईओ स्टीव्ह बॉल्मर पाचव्या क्रमांकावर; तर बिल गेट्स जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स हे आता जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या जागी आता मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ आणि गेट्स यांचे माजी सहाय्यक स्टीव्ह बॉल्मर यांनी प्रवेश केला आहे.
बिल गेट्स यांच्या एकूण संपत्तीत गेल्या आठवड्यात जवळपास 30 टक्क्यांची घट झाली असून त्यांच्या संपत्तीमध्ये 52 अब्ज डॉलर्सची घसरण झाली आहे. त्यामुळे गेट्स यांची संपत्ती आता सुमारे 124 अब्ज डॉलर्स झाली आहे. ते पाचव्या स्थानावरून थेट बाराव्या स्थानावर गेले आहेत. दुसरीकडे, स्टीव्ह बॉल्मर यांची संपत्ती आता 172 अब्ज डॉलर्स असून ते जगातील पाचवे क्रमांकाचे श्रीमंत ठरले आहेत.
या बदलामागील मुख्य कारण म्हणजे बिल गेट्स यांनी त्यांच्या संपत्तीचे पुनर्मूल्यांकन आणि त्यातून त्यांच्या दानशूरतेचा विचार करून केलेली संपत्तीची नव्याने मोजणी. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, गेट्स यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये यासंदर्भात माहिती दिली होती. त्या आधारे त्यांच्या संपत्तीच्या आकड्यात बदल करण्यात आला आहे.
बिल गेट्स यांचा दानाचा निर्णय
मे महिन्यात लिहिलेल्या ब्लॉगमध्ये बिल गेट्स यांनी नमूद केलं होतं की, त्यांची वैयक्तिक संपत्ती सुमारे 108 अब्ज डॉलर्स आहे. पुढील दोन दशकांत ही संपत्ती ते गेट्स फाउंडेशनच्या माध्यमातून जवळपास पूर्णतः दान करणार आहेत. त्यांनी अंदाज वर्तवला होता की, 2045 पर्यंत फाऊंडेशन सुमारे 200 अब्ज डॉलर्स खर्च करेल. त्यानंतर फाऊंडेशन बंद होईल.
गेट्स आणि त्यांच्या माजी पत्नी मेलिंडा फ्रेंच गेट्स यांनी डिसेंबर 2024 पर्यंत गेट्स फाउंडेशनला मिळून 60 अब्ज डॉलर्सचे योगदान दिले आहे. तर वॉरेन बफे यांनी त्यात 43 अब्ज डॉलर्सचे दान केले आहे.
बिल गेट्स यांच्याकडे सध्या मायक्रोसॉफ्टमधील फक्त 1 टक्के हिस्सा आहे. त्यांनी कंपनीमधून मिळालेल्या स्टॉक्स आणि लाभांशातून सुमारे 60 अब्ज डॉलर्स मिळवले आहेत. त्यांची बहुतांश संपत्ती आता कॅस्केड इन्व्हेस्टमेंट या कंपनीच्या माध्यमातून गुंतवली गेली असून, ही कंपनी रिअल इस्टेट, ऊर्जा, खाजगी आणि सार्वजनिक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते.
बॉल्मर यांची संपत्ती कशी वाढली?
स्टीव्ह बॉल्मर यांनी 2000 मध्ये मायक्रोसॉफ्टचे सीईओ पद भूषवले होते. 2014 मध्ये कंपनी सोडली होती. कंपनीत काम करत असताना त्यांनी आपली भरपाई 'प्रॉफिट शेअरिंग' ऐवजी 'इक्विटी' स्वरूपात घेतली होती. त्यामुळे कंपनीच्या शेअर किमतीत झालेल्या वाढीचा मोठा फायदा त्यांना झाला. बॉल्मर यांच्याकडे मायक्रोसॉफ्टमधील सुमारे 4 टक्के हिस्सेदारी आहे.
मायक्रोसॉफ्टच्या शेअरमध्ये गेल्या दशकभरात झालेली विक्रमी वाढ आणि बॉल्मर यांनी त्यांच्या शेअर्स विकले नाहीत. त्यामुळे आज ते गेट्स यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत ठरले आहेत. सध्या बॉल्मर हे एलए क्लिपर्स या बास्केटबॉल संघाचे मालक देखील आहेत.
सध्याची श्रीमंतांची स्थिती
नवीन आकडेवारीनुसार बिल गेट्स हे आता अल्फाबेटचे सह-संस्थापक लॅरी पेज, सर्गे ब्रिन, एनव्हिडियाचे सीईओ जेनसेन हुआंग आणि वॉरेन बफे यांच्याही मागे गेले आहेत.
बिल गेट्स यांचा हा पतन त्यांच्या दानशूरतेचा परिणाम आहे. ज्यामुळे ते संपत्तीच्या यादीत मागे असले तरी, समाजासाठी योगदान देण्यात आघाडीवर आहेत, असे मत अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.