Rupali Chakankar : 'महाराष्ट्रात ब्रम्हा, विष्णु, महेशाचं सरकार, रूपाली चाकणकर यांच्याकडून नेत्यांची देवाबरोबर तुलना
महाराष्ट्रात सध्या सत्तेत असलेल्या तीन प्रमुख नेत्यांची तुलना ब्रह्मा–विष्णू–महेश या त्रिदेवांशी करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केलेल्या या विधानावर आता काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सरकारवर हल्लाबोल करताना हे देवांचा अपमान असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्रात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या युतीचे सरकार सत्तेवर आहे. या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये सत्ता वाटप आणि निर्णय प्रक्रियेबाबत वेळोवेळी मतभेद होत असल्याचे आरोप होत असतानाच, रूपाली चाकणकर यांनी "महाराष्ट्रात त्रिदेवांचे सरकार आहे, ब्रह्मा–विष्णू–महेशांचे सरकार आहे" असे विधान केले. त्यांच्या या विधानाने नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटले आहे.
रूपाली चाकणकर काय म्हणाल्या?
रूपाली चाकणकर यांनी महाराष्ट्र सरकारचे कौतुक करताना म्हटल्या, “महाराष्ट्र में हमारी सरकार त्रिदेव की सरकार है, ब्रह्मा, विष्णू, महेश की सरकार है. हमारे देवेंद्रजी बताई तो सहयोग कर…” त्यांच्या या वक्तव्याने त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व प्रमुख नेत्यांना देवतांची उपमा दिली असल्याचे स्पष्ट दिसते.
या वक्तव्यावर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे जोरदार हल्लाबोल करत म्हणाले, “शेतकरी हवालदिल झालेले आहेत. आत्महत्यांचा प्रश्न दिवसेंदिवस वाढतोय. ड्रग्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. बेरोजगारी गंभीर स्थितीत आहे. एमपीएससीच्या परीक्षा वेळेवर होत नाहीत, झाल्या तरी निकाल लागत नाहीत. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. अशा सरकारला ब्रह्मा–विष्णू–महेशांची उपमा देणे म्हणजे देवांचा अपमान आहे.”
पुढे ते म्हणाले की, “हे सरकार राज्याच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करते आहे. अजित दादांनी स्वतः मान्य केले आहे की सरकारने राज्याचे वाटोळे केले आहे. मग अशा सरकारला देवांची उपमा देऊन धर्माचा अपमान करण्याचा प्रयत्न होतो आहे.” शेवटी त्यांनी टोला लगावत विचारले की, “रूपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनची टर्म संपत आल्यामुळे का अशा वक्तव्यांद्वारे एक्स्टेन्शन मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे?”
रूपाली चाकणकर यांच्या "त्रिदेव सरकार" या विधानाने महाराष्ट्रातील राजकारणात नवीन वादाला तोंड फोडले आहे. देवतांची उपमा वापरून सरकारचे कौतुक करण्याच्या या पद्धतीवर काँग्रेसने टीकास्त्र सोडले आहे. आगामी काळात या विधानावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आणखी जुंपण होण्याची शक्यता आहे.