प्राजक्ता माळी ते परळी पॅटर्न, सुरेश धस राजकारण करताय; मिटकरींवरील टीकेनंतर रुपाली पाटील संतापल्या
बीड प्रकरणावर बोलत असताना भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचं थेट नाव घेतलं. सुरेश धस यांनी म्हटले की, कोणाला भविष्यात इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स करायचं असेल, तर त्यांनी परळीला या. सपना चौधरी, रश्मिका मंधाना, प्राजक्ता माळीसुद्धा आमच्याकडे येतात. कोणाला नवीन चित्रपट काढायचा असेल, तर अशा मोठ्या विभूती आहेत, त्यांच्या तारखा कशा मिळतात, त्याचे धडे इथे घेता येतील. प्राजक्ता ताईही आमच्या इथे येतात. इव्हेंटसाठी. आमचा परळी पॅटर्न आहे. असे सुरेश धस म्हणाले.
यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे. रुपाली पाटील म्हणाल्या की, बीडमधील मस्साजोग येथे सरपंचाची जी हत्या करण्यात आली. त्या गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. जे गुन्हेगार आहेत त्यांना अटक झाली पाहिजे. याच्यामध्ये कोणालाही सोडणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितले आहे. तरीसुद्धा सातत्याने आमदार धस हे ज्या भाषेत बोलत आहेत. मला त्यांना विचारायचे आहे. तुम्हाला आपल्या मुख्यमंत्र्यावर, तुम्ही ज्या पक्षात आहात त्या वरिष्ठ नेत्यांनी जे सांगितलेले आहे. हे तुम्हाला मान्य नाही का? काल सुरेश धस यांनी हिरोईनींचा दाखला दिला. तेव्हा कुठेतरी वाटलं याला राजकीय पोळी भाजून घेणं म्हणतात. त्यांना जी हत्या झाली त्या मारेकऱ्यांना शिक्षा द्यायची आहे, त्या कुटुंबाला न्याय द्यायचा आहे की या संधीचा फायदा घेऊन राजकीय पोळी भाजायची याचा काल प्रत्यय आला. त्यांनी जी भाषा केली अभिनेत्री रश्मिका, प्राजक्ता माळी, सपना चौधरी. कोणी कुणाच्या कार्यक्रमाला जायचं, कुणाला वेळ द्यायची हे त्या अभिनेत्रींचे खासगी आयुष्य आहे आणि या गुन्हाचे गांभीर्य फार मोठे आहे. या गुन्हाची गांभीर्यता कमी करण्यासाठी धस यांच्याकडून प्रयत्न केला जातोय का?
यासोबतच सुरेश धस यांनी अमोल मिटकरींवर दिलेल्या प्रतिक्रियेवर देखील रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या की, तुम्ही त्या जिल्ह्यातलं आमदार आहात. तुम्ही वाट्टेल ती वक्तव्य करत आहात. परंतु या घटनेचा तपास कायदेशीर पद्धतीने होऊन मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले, अजितदादांनी सांगितले कोणालाही सोडणार नाही. गुन्हेगारांना फाशीची शिक्षा होईल. परंतु तपासामध्ये व्यत्यय आणण्याचे काम धस हे करत आहेत. त्यांनी अमोल मिटकरींनाही धमकी दिली की, माझ्यासारख्या रगीलाच्या मागे तू जाऊ नकोस. ही कुठल्या आमदाराची भाषा आहे. मला विचारायचे आहे की, तुम्हाला अमोल मिटकरींना गोळ्याच झाडायच्या असतील तर सांगा ना, मग आम्हाला कळेल बीडमध्ये गुन्हेगारी कोणाची वाढलेली आहे. असे रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या.