Rupali Thombre Patil : रुपाली ठोंबरे पाटील यांची प्रवक्तेपदावरुन उचलबांगडी
थोडक्यात
रुपाली ठोंबरे पाटील यांची प्रवक्तेपदावरुन उचलबांगडी
राष्ट्रवादीकडून नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर
हेमलता पाटील,प्रतिभा शिंदेंची प्रवक्तेपदी नियुक्ती
सातत्याने गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यं करुन स्वत:च्या पक्षाची कोंडी करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) आणि रुपाली ठोंबरे-पाटील (Rupali Patil Thombare) यांची प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये सातत्याने तणाव निर्माण होताना दिसत होता. तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यावर रुपाली पाटील ठोंबरे यांनी तिखट आणि शेलक्या भाषेत टीका केली होती.
रुपाली ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्याप्रकरणावरुन आपल्याच पक्षाच्या रुपाली चाकणकर यांना लक्ष्य केले होते. त्यामुळे रुपाली ठोंबरे पाटील यांना कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आली होती. त्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी अजित पवार यांचीही भेट घेतली होती. ही भेट होऊन काही तास उलटत नाही तोच रुपाली ठोंबरे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.
याशिवाय, वैशाली नागवडे आणि संजय तटकरे यांना देखील प्रवक्ते पदावरून हटवण्यात आले आहे. तर मध्यंतरी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्यामुळे पायउतार व्हावे लागलेल्या सुरज चव्हाण यांची पुन्हा एकदा प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावर अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे पाटील काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.
