Russia : रशियाचा युक्रेनवर 805 ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला
थोडक्यात
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला
805 ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला
सरकारी इमारती लक्ष्य, 2 ठार, 15 जखमी
युक्रेनवर रशियाने सर्वात मोठा हल्ला केला आहे. ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा एकत्रित मारा करून रशियाने राजधानी कीव्हसह 37 भागांना लक्ष्य केले. या कारवाईत दोन जणांचा मृत्यू झाला असून 15 नागरिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका वर्षाच्या बालकाचाही समावेश आहे. रशियाने तब्बल 805 ड्रोन आणि 13 क्षेपणास्त्रांचा वापर केला. युक्रेनच्या हवाई दलाने त्यातील 747 ड्रोन आणि 4 क्षेपणास्त्रे पाडल्याचा दावा केला आहे.
या घटनांवर प्रतिक्रिया देताना युक्रेनच्या पंतप्रधान युलिया स्विरीदेंको म्हणाल्या, "इमारती पुन्हा उभारता येतील, पण जीव परत आणता येणार नाहीत. आंतरराष्ट्रीय समुदायाने केवळ शब्दांच्या निषेधावर न थांबता कृती करणे आवश्यक आहे. रशियावर अधिक कठोर निर्बंध लादले गेले पाहिजेत."
गेल्या काही दिवसांत 26 मित्रदेशांनी युक्रेनच्या सुरक्षिततेसाठी ‘पुनर्हमी दल’ म्हणून सैन्य पाठविण्याची तयारी दर्शवली होती. या हालचालींच्या पार्श्वभूमीवरच रशियाने हा मोठा हल्ला चढविल्याचे विश्लेषकांचे मत आहे. दुसरीकडे, युरोपीय नेत्यांनी पुतिन यांना युद्ध संपविण्याचे आवाहन केले असले तरी प्रत्यक्षात संघर्ष अधिकच तीव्र होत चालल्याचे चित्र आहे.
या युद्धाचे पडसाद केवळ युक्रेनपुरते मर्यादित न राहता जगभर उमटत आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणातील तणाव, इंधनबाजारातील चढउतार आणि जागतिक अर्थव्यवस्थेवरील परिणाम अधिक ठळक होत आहेत. मानवी जीवितहानी वाढत असताना आंतरराष्ट्रीय समुदायाने ठोस आणि परिणामकारक पावले उचलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सध्याची परिस्थिती निर्णायक टप्प्यावर पोहोचली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.