“बाबासाहेब, देश संकटात आहे, तुमची प्रकर्षाने आठवण येतेय”, महापरिनिर्वाणदिनी सामनाचा अग्रलेख

“बाबासाहेब, देश संकटात आहे, तुमची प्रकर्षाने आठवण येतेय”, महापरिनिर्वाणदिनी सामनाचा अग्रलेख

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आज 66 वा महापरिनिर्वाण दिन आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आज 66 वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्ताने मुंबईतल्या दादरच्या शिवाजी पार्क परिसरात अनुयायांची गर्दी वाढू लागली आहे. कोरोना नंतर पहिल्यांदाच असा जाहीर कार्यक्रम असल्यानं बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येनं येत आहेत. त्यांच्या व्यवस्थेसाठी प्रशासकीय यंत्रणाही सज्ज आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं आंबेडकरांचे अनुयायी दाखल झाले आहेत.

याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचा अग्रलेख सामनातून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिली. त्यात लोकशाही, स्वातंत्र्य सगळेच आले. लोकशाही म्हणजे संवाद. शासन आणि जनता यांच्यातील संवाद, म्हणजेच खरीखुरी लोकशाही. बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक यांच्यातील संवाद लोकशाहीला अभिप्रेत आहे. ज्यांचे सरकारशी चांगले जमते आणि ज्यांची मतभिन्नता आहे त्यांच्यात संवाद व्हायलाच हवा. मात्र केवळ ज्यांच्याकडे बहुमत आहे त्या बहुमतवाल्यांचे शासन म्हणजे लोकशाही नव्हे. लोकशाहीमध्ये बहुमतवाल्यांच्या शासनाला विरोधकांची गर्भित व उघड संमती आवश्यक असते. म्हणूनच विरोधकांचा आवाज बंद पाडून तुम्ही त्यांना नष्ट करू शकत नाही. असे सामनातून म्हटले आहे.

तसेच लोकशाही संकटात आहे. आज तुमची प्रकर्षाने आठवण येतेय. आम्ही तमाम शिवसैनिक तुमची आठवण काढत आहोत, असं सामनात म्हणण्यात आलं आहे. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिली. न्याय, स्वातंत्र्य , लोकशाही , नागरिकांचा हक्क यांचा पुरस्कार केला . आज त्या घटनेची पदोपदी पायमल्ली होत आहे . न्यायालये , वृत्तपत्रे , निवडणूक आयोग , संसद असे सर्व घटनात्मक स्तंभ कोलमडून पडले आहेत”

आजच्या सरकारने लोकशाहीच्या या प्राथमिक मूल्यावरच प्रहार केला आहे ! अशावेळी डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण प्रकर्षाने होतेय . लोकशाही , स्वातंत्र्य जेव्हा जेव्हा संकटात येईल त्या त्या वेळी डॉ . बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचे स्मरण करावेच लागेल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमीच सांगत, ‘महाराष्ट्राची दोनच दैवते खरी. पहिले शिवाजी महाराज व दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.’ मात्र या दोन्ही दैवतांचा आज राजकारणापुरता वापर करण्याचे तंत्र सध्याच्या राज्यकर्त्यांनी अवलंबिले आहे, असे सामनातून म्हटले गेले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com