"शिंद्यांची भाकरी करपली, आता नवी चूल, नवा तवा"; सामनातून जोरदार टीका

"शिंद्यांची भाकरी करपली, आता नवी चूल, नवा तवा"; सामनातून जोरदार टीका

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचा अग्रलेख सामनातून जोरदार टीका करण्यात आली आहे. सामनातून म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाऱ्यांवर प्रहार करतात व 24 तासांत भ्रष्टाचाऱ्यांसाठी पायघड्या घालतात. अजित पवार यांनी त्यांच्या काही समर्थकांसह पक्ष सोडला, तो काही फार मोठ्या नैतिकतेच्या विचाराने नक्कीच नाही. भाजपा आता शिंद्यांचे राजकारण अजित पवारांच्या चुलीत घालेल व त्यावर शेकोटी घेत बसेल. महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री लवकरच मिळेल. तोही औटघटकेचाच ठरेल. शिवरायांच्या राज्यात हे काय चालले आहे? असा सवाल विचारण्यात आला आहे.

तसेच अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांसह रविवारी दुपारी राजभवनात पोहोचतात. पाठोपाठ देवेंद्र फडणवीस त्यांच्या लवाजम्यासह येतात व पवार हे आठ मंत्र्यांसह शपथ घेऊन स्वतःला भाजपच्या दावणीला बांधून घेतात. अजित पवार यांच्या सरकारीकरणास काय म्हणायचे? पवार हे विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते. विरोधी पक्षनेत्यानेच असं सरकारजमा व्हायचे हे लोकशाहीच्या व नैतिकतेच्या कोणत्या प्रकारात बसते? लोकांची मती गुंग करणारा व राजकीय पुढाऱ्यांवरचा विश्वास उडवणारा प्रकार महाराष्ट्रात घडवला आहे. महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री लवकरच मिळेल. तोही औटघटकेचाच ठरेल, असा दावाही सामनातून करण्यात आला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे, पण यावेळी 'डील' पक्की आहे. पवार हे उपमुख्यमंत्री पदासाठी गेले नाहीत. लवकरच घटनेनुसार, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या फुटीर आमदारांचं विसर्जन होईल आणि अजित पवारांना सिंहासनावर बसवले जाईल.

शरद पवार यांनी महिनाभरापूर्वीच पक्षात भाकरी फिरवली. अजित पवारांनी लगेच नवी चूल, नवा तवा आणून स्वतःची भाकरी थापली. शिंद्यांची भाकरी करपली. भाजप आता शिंद्यांचे राजकारण अजित पवारांच्या चुलीत घालेल आणि त्यावर शेकोटी घेत बसेल. असे म्हणत सामनातून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com