सदा सरवणकरांच्या अडचणी वाढणार? गोळी सरवणकरांच्याच बंदुकीतूनच सुटली; बॅलेस्टिक अहवालातून स्पष्ट
सदा सरवणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रभादेवी राड्यादरम्यान, दादर पोलीस स्थानकाबाहेर जी गोळी चालवण्यात आली होती. ती सदा सरवणकरांच्याच बंदुकीतूनच सुटली असल्याचं बॅलेस्टिक अहवालातून स्पष्ट झाले आहे. गणेश विसर्जनच्या दिवशी प्रभादेवी परिसरात शिवसेनेकडून गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी मंच उभारण्यात आला होता. मात्र, या मंचाच्या शेजारी शिंदे गटाने देखील आपला मंच उभारला होता. या मंचावरून शिंदे गटाच्या लोकांनी शिवसेनेच्या नेत्यांवर अपशब्द वापरले. त्यामुळे दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाचीदेखील झाली.
या वादाचे रुपांतर मध्यरात्रीतील राड्यात झाले. शिंदे गटात असलेले माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि वरळीतील शिवसेनेच्या माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्यात वाद झाले होते. दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर शनिवारी शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना शांत राहण्याचे आदेश दिल्यानंतर संघर्ष टळला होता. परंतु शनिवारी हा वाद पुन्हा उफाळून आला. सदा सरवणकर समर्थकांकडून शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केल्यानंतर शाब्दिक बाचाबाचीही झाली. यानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह शिवसैनिकांना पिस्तूलचा धाक दाखवून गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. त्यानंतर सदा सरवणकर यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल झाला.