Saamana
Saamana

Samana Editorial: सामनातून आणीबाणीचं समर्थन करत कंगनावर जोरदार टीका

शिवसेनेचं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुखपत्र सामनामधून अभिनेत्री कंगना राणावतच्या इमर्जन्सी चित्रपटावरून जोरदार टीकास्त्र डागण्यात आलं आहे.
Published by :
Published on

थोडक्यात

  • सामनातून आणीबाणीचं समर्थन, कंगनावर टीका

  • सामनाच्या रोखठोक सदरातून कंगनावर टीकास्त्र

  • इमर्जन्सी चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोसळला...ही इंदिरा गांधींची ताकद, सामनातून टीकास्त्र

शिवसेनेचं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुखपत्र सामनामधून अभिनेत्री कंगना राणावतच्या इमर्जन्सी चित्रपटावरून जोरदार टीकास्त्र डागण्यात आलं आहे. कंगनावर टीका करत इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीचं समर्थन ही केलं आहे. कंगना राणावतने इंदिरा गांधी यांना खलनायिका ठरवणारा 'इमर्जन्सी' हा चित्रपट काढला. मात्र, बॉक्स ऑफिसवर तो साफ कोसळला. हीच इंदिरा गांधींची ताकद असल्याचं सामनाच्या रोखठोक सदरात म्हटलं आहे. दरम्यान, प्रजासत्ताकदिनी आणीबाणीचं समर्थन केल्याने सामनावर टीका ही केली जात आहे.

सामनाच्या अग्रलेखात इंदिरा गांधी यांचं कौतुक

"इंदिरा गांधी हे असामान्य व्यक्तिमत्त्व होते. आज जो भारत देश उभा आहे, त्याची पायाभरणी पंडित नेहरूंनंतर इंदिरा गांधी यांनीच केली. इंदिरा गांधी यांना खलनायिका ठरवणे ही भारतीय इतिहासाची क्रूर थट्टा आहे. ज्यांनी देशाच्या जडणघडणीत काहीच योगदान दिले नाही, असे आजचे सत्ताधीश व त्यांचे आंधळे अनुयायी हे सर्व करत आहेत. कंगना राणावत व त्यांच्या `इमर्जन्सी’ चित्रपटाने जे भारावून गेले त्यांना भारत कळलाच नाही. इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावली ती राष्ट्रीय सुरक्षेसाठी." असं म्हणत सामनातून इंदिरा गांधींच्या आणीबाणी निर्णयाचं कौतुक केलं आहे.

इंदिरा गांधींना खलनायिका ठरवणारे चित्रपट प्रदर्शित करणे राष्ट्रीय अपराध- सामना

"कंगना राणावत हिचा इमर्जन्सी' हा सिनेमा आल्या आल्याच बॉक्स ऑफिसवर कोसळला, हे बरे झाल्याचं म्हटलं आहे. खरा इतिहास नष्ट करायचा विडा काही लोकांनी उचलला आहे. सत्य झाकले जात आहे. काही महाविद्वान लोकं सिनेमाच्या माध्यमातून आपल्या मर्जीनुसार इतिहासाचे पुनर्लेखन करीत आहेत. कंगना राणावत या भाजपच्या गोटात आहेत व मोदींच्या अंधभक्त महामेळाव्यात त्या बॅण्ड अॅम्बेसेडर असल्याने त्यांनी इमर्जन्सी' चित्रपटात इंदिरा गांधी यांना खलनायिका ठरवले आहे आणि त्या काळाचा संपूर्ण इतिहास मोडून तोडून सादर केला आहे. इंदिरा गांधी यांना खलनायिका ठरवणे ही भारतीय इतिहासाची क्रूर थट्टा आहे." असल्याचं सामनाच्या रोखठोक सदरात म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com