'विशाळगड अतिक्रमणाबाबत राजकारण नको'; छत्रपती संभाजीराजे यांचा इशारा

'विशाळगड अतिक्रमणाबाबत राजकारण नको'; छत्रपती संभाजीराजे यांचा इशारा

विशाळगड अतिक्रमणाबाबत स्थानिक आमदारांनी मतांचे राजकारण करू नये अन्यथा शिवप्रेमी जनता धडा शिकवेल असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी दिला आहे.

विशाळगड अतिक्रमणाबाबत स्थानिक आमदारांनी मतांचे राजकारण करू नये अन्यथा शिवप्रेमी जनता धडा शिकवेल असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी दिला आहे. याबाबत संभाजी राजे छत्रपती यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी विशाळगडावरील अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय झालेला असताना देखील स्थानिक आमदार पुन्हा एकदा परस्पर व गुपचूप प्रशासकीय बैठक लावून काय साध्य करू पाहत आहेत ? असा खडा सवाल विचारत आमदारांनी शे-पाचशे मतांसाठी विशाळगडच्या अस्तित्वावर घाव घालण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा दिलेला आहे.

महाशिवरात्री पूर्वी अतिक्रमणे हटविण्याची कारवाई पूर्ण केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर विशाळगड अतिक्रमण बाबत शाहूवाडीचे आमदार विनय कोरे यांनी काल जिल्हा प्रशासनासोबत परस्पर बैठक बोलाविली असल्याचे शिवप्रेमींच्या निदर्शनास आले. या बैठकीस विशाळगडाच्या अतिक्रमित रहिवाशांना निमंत्रण होते, मात्र कोणत्याही दुर्गप्रेमी संस्थेस याबाबत कोणतीच कल्पना देण्यात आलेली नव्हती. यावर शिवभक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन मोठा रोष निर्माण करताच आमदार कोरे या बैठकीस आलेच नाहीत व बैठक रद्द झाली.

अजूनही गडावर चालू असलेल्या करवाईवर दबाव आणून ती बंद पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आता शिवभक्त जागा झाला आहे, तुमची मतांची गोळाबेरीज विशाळगडच्या बाबतीत चालू देणार नाही, असा कडक इशारा देत आमदारांच्या या गुपचूप बैठकीचा राजकीय डाव उधळणाऱ्या दुर्गप्रेमी शिवभक्तांचे त्यांनी अभिनंदन केले आहे. प्रशासनाने आश्वासन दिल्यानुसार महाशिवरात्रीच्या आधी विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटविलीच पाहिजेत, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.

छत्रपती संभाजीराजे यांनी दीड महिन्यापूर्वी समस्त शिवभक्त आणि दुर्गप्रेमी मंडळींच्या सोबत किल्ले विशाळगडची पाहणी करून जिल्हा प्रशासनासोबत विशाळगडावरील अतिक्रमणे हटविण्या संदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीत विशाळगडाचे अतिक्रमित रहिवासी, दुर्गप्रेमी संस्था, संबंधित प्रशासकीय अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांना निमंत्रण होते. मात्र लोकप्रतिनिधींनी या बैठकीकडे पाठ फिरविली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com