Sanjay Raut : "तिच सेटिंग आणि तोच पैसा...." संजय राऊतांचा रोख नेमका कुणावर?
Sanjay Raut on Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 : राज्याच्या विधानसभा निवडणुकीतील निकालांचे आकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही तंतोतंत दिसत असल्याचा गंभीर आरोप माध्यमांशी बोलताना शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, “तेच आकडे, तीच ईव्हीएम मशीन, तेच सेटिंग आणि तोच पैसा वापरला जात आहे. आकड्यांमध्ये अजिबात बदल दिसत नाही, हे लोकशाहीसाठी अत्यंत चिंताजनक आहे.”
संजय राऊत यांनी भाजप आणि सत्ताधारी पक्षांवर निवडणुकांमध्ये पैशांचा प्रचंड वापर केल्याचा आरोप केला. ३० कोटींच्या बजेटच्या नगरपालिकेसाठी 100 ते 150 कोटी रुपये खर्च केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. आतापर्यंत कधीही न पाहिलेल्या पद्धतीने प्रचारासाठी हेलिकॉप्टर आणि चार्टर फ्लाइट्सचा वापर होत असल्याचे त्यांनी नमूद केले. “ही लोकशाही नाही, हा पैशाचा खेळ आहे,” अशी टीका त्यांनी केली.
महायुतीच्या विजयाच्या दाव्यांवरही राऊतांनी सवाल उपस्थित केला. “जर विजय महायुतीचा आहे, तर मग नगरपालिकांमध्ये एकमेकांविरुद्ध का लढण्यात आलं?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. काही ठिकाणी सत्ताधारी पक्षांचा पराभव झाला असला, तरी एकूण आकड्यांमध्ये संशयास्पद साम्य असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
“हा विचारांचा विजय नाही, हा पैशाचा आणि सत्तेच्या दहशतीचा विजय आहे. मात्र अशी व्यवस्था फार काळ टिकणारी नाही,” असा इशाराही संजय राऊत यांनी दिला. विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील निकालांमधील साम्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

