Sanyukt Kisan Morcha : आज मुंबईत संयुक्त किसान मोर्चाचे राज्यस्तरीय अधिवेशन
आज मुंबईत संयुक्त किसान मोर्चाचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हे अधिवेशन होणार आहे. दुपारी तीन वाजता या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, या अधिवेशनात संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते उपस्थित राहणार आहेत.दिल्लीतील किसान आंदोलनात महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या संघटनांच्या पुढाकारातून राज्य शाखा स्थापनेचे हे अधिवेशन घेण्यात येत आहे.
या संमेलनात महाराष्ट्रातील 27 किसान संघटना एकत्र येत आहेत.या अधिवेशनात संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते उपस्थित रहाणार असून त्यात कॉ राजाराम सिंग, श्री. डॉ. दर्शनपाल, कॉ अतुल कुमार अंजान, कॉ. डॉ. अशोक ढवळे, मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, डॉ. सुनिलम उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाच्या निमित्ताने शेतीवर अवलंबून असणारे सर्व घटक - शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, शेतीत राबणाऱ्या महिला, आदिवासी, मच्छिमार, या सर्वांच्या प्रश्नांवर विस्तृत मांडणी करणारा, त्यासंबंधी प्रमुख मागण्या अधोरेखित करणारा, आणि येत्या काळातील जोरदार राज्यव्यापी कृती कार्यक्रम देणारा एक जाहीरनामा घोषित केला जाणार असून त्या आधारे महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनाला मोठी चालना देण्यात येणार आहे.
दिल्लीच्या सीमांवर २६ नोव्हेंबर २०२० ते ११ डिसेंबर २०२१ असा वर्षभर कडवा संघर्ष करत संयुक्त किसान मोर्चाने अभूतपूर्व विजय प्राप्त केला. केंद्र सरकारला तीन शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यायला भाग पाडले. शेतकरी आंदोलनातील ७००हून अधिक शहिदांच्या परिवाराना सहाय्य, लखीमपूर खेरी हत्याकांडातील आरोपींना शिक्षा अशी अनेक आश्वासने तेव्हा सरकारने दिली होती. प्रत्यक्षात मात्र कृषी कायदे रद्द करण्याव्यतिरिक्त केंद्र सरकारने इतर आश्वासने पाळली नाहीत. परिणामी संयुक्त किसान मोर्चाला आपला संघर्ष सुरूच ठेवावा लागला. या संघर्षाला बळ देण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने राज्यस्तरावर संयुक्त किसान मोर्चाच्या शाखा स्थापन करण्याची हाक दिली.