'...तो माणूस निवडून आणूच शकत नाही' संग्राम जगताप यांचा राज ठाकरेंवर पलटवार
राज ठाकरे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभेत निवडून आलेल्या 42 आमदारावर आश्चर्य व्यक्त करत संशय व्यक्त केला होता. त्यांनी व्यक्त केलेल्या संशयानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी प्रत्युत्तर देत राज ठाकरेंवर हल्ला चढवला आहे.
संग्राम जगताप म्हणाले की, अजित पवार हे पहाटे सहा वाजता घराबाहेर असतात आणि त्यामुळे त्यांच्या कष्टाने त्यांनी आमदार निवडून आणले. परंतु जो माणूस दुपारी बारा आणि एक वाजता घरा बाहेर पडत असेल तो माणूस निवडून आणूच शकत नाही. अशी टीका संग्राम जगताप यांनी केलीये.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
मनसेच्या मुंबईतील मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाष्य केलं होतं. यावेळी ते म्हणाले की, सत्तेत असलेल्या अनेकांचा मला फोन आले, त्यांनाही शॉक बसलाय. भाजपला 132 जागा मिळाल्या, गेल्यावेळी 105 जागा होत्या. 2014 ला 122 जागा त्यांनी जिंकल्या होत्या. पण अजित पवार 42 जागा, चार-पाच जागा येतील की नाही, असं वाटत असताना त्यांना 42 जागा मिळाल्या. जे इतके वर्षे महाराष्ट्रात राजकारण करत आले त्यांना 10 जागा मिळतात, ही न समजण्यापलीकडची गोष्ट आहे. लोकसभेला काँग्रेसचे सर्वाधिक 13 खासदार निवडून आले. एका खासदाराच्या खाली सहा आमदार येतात निवडून. त्यांचे 15 आमदार निवडून आले. शरद पवारांचे 8 खासदार निवडून आले होते, त्यांचे 10 आमदार येतात. लोकसभेला ज्या अजित पवार यांचा एक खासदार निवडून येतात त्यांचे 42 आमदार चार महिन्यात निवडून आले. काय झालं, कसं झालं, हा संशोधनाचा विषय आहे.