Sanjay Raut On Devendra Fadnavis : मुंबईत कबुतरांसाठी आंदोलनांना परवानगी, मग मराठी माणसाला का नाही? संजय राऊतांचा फडणवीसांना सवाल
Sanjay Raut : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला असून, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला मुंबईत अवघ्या एका दिवसाची परवानगी दिल्याने संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे.
राऊत म्हणाले की, "मुंबईत लोकं कबुतरांसाठी आंदोलन करतात, त्यांना सरकार परवानगी देते. मग मराठी माणसाला आपल्या राजधानीत आंदोलन करण्याचा अधिकार नाही का?" मुंबई ही केवळ एका भागाची राजधानी नसून कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र सगळ्यांचीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची असली तरी आंदोलकांना थांबवणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्ला देत सांगितले की, "आंदोलनकर्त्यांना थांबवण्याऐवजी त्यांच्याशी थेट संवाद साधा. मराठी माणसाला आंदोलन करण्याचा अधिकार नाकारणे चुकीचे आहे."
राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. "गेल्या दहा वर्षांत मोदी केंद्रात आणि फडणवीस राज्यात जातीजातींचे तुकडे पाडण्याचे काम करत आले. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांची एकजूट घडवली होती, पण फडणवीसांनी ती मोडून टाकली आणि सत्तेसाठी समाजात फूट पाडली," असा आरोप त्यांनी केला.
यामुळे मराठा आंदोलनावरून पुन्हा एकदा राजकीय वादंग निर्माण झाले असून, पुढील काही दिवसांत संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.