Sanjay Raut : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर, संजय राऊत म्हणाले...
थोडक्यात
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर
महाराष्ट्रात कोणी किती जागा जिंकल्या?
बिहारमध्ये चित्र काय?
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. सध्या संजय राऊत आजारी आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती जास्त ढासळल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. संजय राऊत दररोज सकाळी पत्रकार परिषद घ्यायचे. पण सध्या आजारी असल्यामुळे संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदा बंद आहेत. दोन महिने डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. सार्वजनिक जीवनापासून थोडं लांब राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे राऊत सध्या कॅमेऱ्यापासून लांब आहेत. दोन महिन्यांनी मी पुन्हा ठणठणीत होऊन येईन असं संजय राऊत म्हणाले आहेत.
आता बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली आहे. “बिहाराच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही. निवडणूक आयोग आणि बी जे पी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते!. एकदम महाराष्ट्र पॅटर्न!. जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्याना ५० च्या आत संपवले!” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात कोणी किती जागा जिंकल्या?
मागच्यावर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. त्यावेळी सुद्धा असेच निकाल लागले होते. महायुतीने क्लीन स्वीप करत एकतर्फी विजय मिळवलेला. महाविकास आघाडी अवघ्या 46 जागांमध्ये आटोपलेली. त्यावेळी भाजप महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरेलला. भाजपने 125 पेक्षा जास्ता जागा जिंकलेल्या त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 57 आणि त्याखालोखाल अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता.
बिहारमध्ये चित्र काय?
आता बिहारच चित्र सुद्धा असच आहे. भाजपप्रणीत एनडीए 195 आणि काँग्रेस प्रणीत महाआघाडीला फक्त 38 जागा मिळाल्या आहेत. भाजपकडे 90, नितीश कुमार यांच्या जेडीयूचे 81, एलजेपी 20 आणि एचएएम 4 जागांवर आघाडीवर आहे. तेच लालू प्रसाद यादव यांची राष्ट्रीय जनता दलाला 28, काँग्रेसला 5 आणि डावे 4 जागांवर आघाडीवर आहेत.
