Sanjay Raut On Devendra Fadnavis
Sanjay RautLokshahi

"विधानपरिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार थांबवायचा असेल, तर...", फडणवीसांच्या विधानावर संजय राऊतांचं रोखठोक उत्तर

"आगामी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीत जोरदार सामना रंगणार आहे. तत्पूर्वी, खासदार संजय राऊत यांनी या निवडणुकीबाबत मोठं विधान केलं आहे"
Published by :

Sanjay Raut Press Conference : आगामी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीत जोरदार सामना रंगणार आहे. तत्पूर्वी, खासदार संजय राऊत यांनी या निवडणुकीबाबत मोठं विधान केलं आहे. देवेंद्र फडणवीस सांगत होते की, घोडेबाजार थांबवायचा असेल तर त्यांनी उमेदवार मागे घ्यावा, यावर बोलताना राऊत म्हणाले, त्यांनीच उमेदवार मागे घ्यावा. त्यांच्याकडे मतं नाहीत. अजित पवारांकडे किंवा मिंधे गटाकडे दुसरा उमेदवार निवडून आणावा इतकी मतच नाही आहेत. भाजपने जादा उमेदवार टाकला आहे, असं आम्हाला वाटतं. त्यांनी मागे घ्यावा आणि घोडेबाजार थांबवावा. फडणवीसांनी किंवा इतर काही लोकांनी या महाराष्ट्रात सत्तेच्या बळावर घोडेबाजार केला. पण आता त्यांना ते जमणार नाही, असं म्हणत राऊतांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे.

पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीतर्फे आमचे तीन उमेदवार आहेत. काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, शेकापचे भाई जयंतराव पाटील आणि शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर आहेत. आम्ही तिनही जागा जिंकू याची आम्हाला खात्री आहे. शिंदेंचा गट, अजित पवारांचा गट आणि देवेंद्र फडणवीसांच्या गटाने त्यांच्या जागा सांभाळाव्यात. निवडणूक होणार आहे, हे नक्की आहे किंवा झालेल्या आहेत. आता कोण पडतोय आणि कुणाला क्रॉस वोटिंगची भीती आहे, अलीकडच्या काळात त्यांना आपापल्या आमदारांना सांभाळावं लागतंय, हे पाहावं लागेल. पण सत्ताधारी पक्षात क्रॉस वोटिंग होण्याची भीती सर्वात जास्त आहे.

लोकसभा निवडणुकीचे जे निकाल लागले आहेत, ते पाहता महायुती म्हणून जो काही प्रकार आहे, तो पूर्णपणे पराभूत झाल्याने अनेक आमदारांना आपल्या भविष्याची चिंता वाटते. अशा परिस्थितीत कोणते आमदार काय निर्णय घेतील? हे सांगता येत नाही. आमचे महाविकास आघाडीचे आमदार आमच्यासोबत आहेत. आम्हीही आमच्या आमदारांसोबत आहोत. आम्हाला क्रॉस वोटिंगची भीती अजिबात नाही, असंही संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com