'एकदिवस लालबागचा राजाही गुजरातला नेतील' राऊतांची अमित घणाघाती टीका
खासदार संजय राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. अमित शाहांनी महाराष्ट्रात दळभद्री राजकारण केलं. महाराष्ट्राला कमजोर करून उद्योग गुजरातला नेले. एकदिवस लालबागचा राजाही गुजरातला नेतील अशी टीका त्यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आजपासून पुढील दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर आहे. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी गृहमंत्री मुंबईला येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून संजय राऊत यांनी अमित शहांवर निशाणा साधत टीका केली आहे.
राज्यातील अनेक प्रकल्प, व्यापार, उद्योग आणि महत्त्वाची केंद्र गुजरातला नेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. आज ते देशाचे गृहमंत्री आहत, मात्र ते कमजोर गृहमंत्री आहेत. एकीकडे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे. तर देशात जम्मू-काश्मीर, मणिपूर असेल किंवा देशातील इतर भाग असतील इकडे केंद्रीय गृहमंत्र्यांचे अजिबात लक्ष नाही. राजकारण, पक्षफोडी, लूटमार याला त्यांचा पाठिंबा आहे. राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी सारखे स्वाभिमानी पक्ष फोडून महाराष्ट्र अधिक कमजोर करणे हे एका गृहमंत्र्यांचे काम नाही. महाराष्ट्र विकलांग करायचा, दुबळा करायचा त्यांच्या प्रयत्न आहे आणि त्यासाठीच ते वारंवार महाराष्ट्रात येत असतात. म्हणून महाराष्ट्राची जनता त्यांना महाराष्ट्राचा शत्रू मानते. असेही ते म्हणाले.