Sanjay Raut : "नरेंद्र मोदी, अमित शाहांना इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादू नका"
पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये मराठी ही राजभाषा आहे. पहिल्या क्रमांकाची राजभाषा. मूळात मराठी सक्तीची करा. अजूनही आपली मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये सक्तीची झालेली नाही. सरकारी कागदावर झाली असेल. उद्योग, व्यवसाय, नोकरी, संवाद यामध्ये जोपर्यंत ती सक्तीची होत नाही तोपर्यंत मराठी माणसाला इथं स्थान राहणार नाही.
भारतीय जनता ते प्रमुख लोकं येतात. घाटकोपरला जातात, भाषण करतात. घाटकोपरची भाषा गुजराती. भारतीय जनता पक्षाच्या लोकांना मराठीविषयी कधी तुम्ही ठामपणे बोलताना पाहिलं आहे का? कधीच नाही. याचे कारण या महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये या लोकांचे योगदान नाही. बेळगावमध्ये मराठी भाषेवरती एवढा अत्याचार होत आहे. आता हिंदी लादत आहेत. हिंदीला देशामध्ये विरोध असण्याचे कारणच नाही. हिंदीला राष्ट्र भाषेचा दर्जा आहे. नरेंद्र मोदी, अमित शाहांना इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादू नका. ही त्यांची सोय करत आहेत ते. त्यांना हिंदीही मोडकं तोडकं येते. म्हणून इतर भाषांवरती सूड काढायचा हे बरोबर नाही.
महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये खासकरुन मुंबई जी हिंदी सिनेसृष्टीचे ऊर्जा आहे. जिथून हिंदी सिनेमा बनतो, जिथे हिंदी भाषेचा उगम होतो. तुम्ही अभ्यासक्रमात कशाकरता लादता? तुम्ही अभ्यासक्रमात लादून विद्यार्थ्यांचे नुकसान करु नका. महाराष्ट्रामध्ये सर्व प्रकारच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची केली पाहिजे. एवढी हिंमत तुमच्यात आहे. तर हे उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चाललेलं पडद्यामागचे नाटक आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, कुठला तरी एक पक्ष हिंदीची मागणी करतो. मग त्या पक्षाच्यावतीने कोणीतरी नेत्यांशी चर्चा करतो. दुसऱ्यादिवशी मराठी, हिंदीविषयी एवढं मोठं ट्विट येतं. ते कुठूनतरी सागर बंगल्यावरून, कुठल्यातरी बंगल्यावरुन तयार करुन आलं होते. दुसऱ्या भाषेचा द्वेष आम्ही करणार नाही पण लादू नका. विद्यार्थ्यांवर हे ओझं लादू नका. महाराष्ट्राला, मुंबईला हिंदी शिकवण्याची किंवा लादण्याची गरज नाही. आम्हाला हिंदी शिकवू नका, गुजरातला शिकवा. असे संजय राऊत म्हणाले.