Sanjay Raut : 'ढोंग बंद करा, बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या'
आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, त्यांना बाळासाहेब ठाकरे माहितच नाहीत. अमित शाहांना प्रतिकूल परिस्थितीत आम्ही काय झुंज दिली आणि ही झुंज आम्ही प्रतिकूल परिस्थितीत अमित शाहांशीसुद्धा देत आहोत.
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेपुढे जी परिस्थिती निर्माण केली आहे त्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत संघर्ष करत आज आम्ही उभे आहोत. ती आम्हाला दिलेली बाळासाहेबांची प्रेरणा आहे. नुसतं बाळासाहेब ठाकरेंचं नाव महाराष्ट्रात येऊन मतांसाठी घेतलं म्हणजे ती बाळासाहेबांची प्रेरणा ठरत नाही. हातामध्ये कोणतीही सत्ता नसताना त्यांनी हिंदूंसाठी लढा दिला. त्यांनी मराठी माणसासाठी संघर्ष केला, लढा दिला आणि शिवसेनेसारखी कवचकुंडलं या महाराष्ट्रासाठी निर्माण केली. ही कवचकुंडलं जर अमित शाह आणि मोदींनी तोडण्याचा प्रयत्न केला तर त्यांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार अजिबात नाही.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, बाळासाहेबांना ढोंग आवडत नव्हते. या देशात जे ढोंग सुरु आहे हिंदुत्वाच्या नावाने राजकारणातलं त्या ढोंगाचा प्रतिकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना करते आहे. हाच बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आहे. माझं त्यांना आव्हान आहे शिवसेनेतर्फे आव्हान ही ढोंग बंद करा, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्नने त्यांचा गौरव करा. तर तुम्ही खरे. ही शिवसेनेची मागणी आहे असं समजा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न मिळायलाच पाहिजे. असे संजय राऊत म्हणाले.