Sanjay Raut : सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद
बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत.
याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, हे प्रकरण आता पोलिसांच्या तपासामध्ये आहे आणि न्यायप्रविष्ठ होईल. ज्या दिवशी आपल्याला वाटेल पोलिसांचा तपास योग्य दिशेने जात नाही आहे त्या दिवशी प्रश्न विचारले पाहिजे. पोलिसांनी किंवा सीआयडीने आतापर्यंत केलेली कारवाई मला असं वाटते त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. पोलीस तपासात बाधा येईल असे आता काही करु नये.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, जर प्रकरण आपल्याला योग्य दिशेने न्यायचे असेल खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहचायचे असेल तर मला असं वाटते बीडमध्ये आता सुरेश धस पुरेसे आहेत. सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे. धस साहेब आमचे जे काही बोलत आहेत ते फडणवीसांच्या आशीर्वादशिवाय बोलणार नाहीत. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांनासुद्धा बीडमधला हा दहशतवाद, बंदूकीचे राज्य मोडून काढायचे आहे. असे संजय राऊत म्हणाले.