Sanjay Raut
Sanjay Raut

संजय राऊतांचा महायुतीला थेट इशारा, पत्रकार परिषदेत म्हणाले; "धमक्या देणाऱ्या फडणवीस, अजित पवारांना..."

खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करून महायुतीच्या नेत्यांना धारेवर धरलं.
Published by :

Sanjay Raut Press Conference : जिंकायची तुम्हाला एव्हढीच खात्री असेल, तर फडणवीस आणि अजित पवार अनेक मतदार संघात कोणाल्या धमक्या देत आहेत, काल सोलापूरमध्ये उत्तम जानकरांच्या नावाने धमकी देण्यात आलीय. युतीचं काम करा, नाहीतर तुरुंगात टाकू. तुम्हाला जिंकण्याची एव्हढी खात्री आहे ना, एकटे नरेंद्र मोदी सगळ्यांना भारी. मग धमक्या कशाला देतात, लोकशाही आहे ना, मग लोकांना ठरवू द्या. बारामती-शिरुर मतदार संघात अजित पवार जाहीरपणे धमक्या देत आहेत. व्यापारी-उद्योजकांना नोटिसा देणे. त्यांना बोलवून दंड आकारण्याच्या धमक्या देणं. ५० कोटी, २० कोटींच्या नोटिसा पाठवायच्या आणि त्यांना सांगायचं आमचं काम करायचं. माझ्या पत्नीचं काम करायचं. काम नाही केलं तर तुला ५० कोटी भरावे लागतील, दंड माफ केलं जाणार नाही. या धमक्या कशासाठी देता, ४ जूनला जनता तुम्हाला बघून घेईल, असा थेट इशारा खासदार संजय राऊत यांनी महायुतीला दिला आहे.

पत्रकार परिषदेत संजय राऊत पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, अमित शहा, अजित पवार असतील, ही भाषा तुम्ही करत असाल, तर या राज्याच्या लोकांनी काय करायचं ते ठरवलं आहे. तुमच्या धमक्यांना २५ लोक भीख घालतील. कारण त्यांच्याशी तुमचे आर्थिक हितसंबंध आहेत. ते तुमचे ठेकेदार आहेत. जनता हा दबाव झुगारणार नाही. बारामती लोकसभा मतदार संघात अजित पवार गावागावात धमक्या देत आहेत. मला मतदान दिलं नाही, तर बघून घेईल. ही भाषा तुम्हाला शोभते का. शरद पवार खरे की तुम्ही खरे, याचा लोकांना निर्णय घेऊ द्या. बारामतीची लढाई महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे. ४८ जागा आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. कुणीतरी दिल्ली, गुजरातचे ऐरेगैरे येतील. बारामतीत आम्ही तुमचा पराभव करुन दाखवतो. जेव्हा आमच्या अस्मितेवर घाला घालतात, तेव्हा आम्ही सर्व एकत्र येतो.

शरद पवारांचा पराभव आम्ही करू शकतो, हे त्यांना दाखवायचं असेल, तर ते शक्य नाही. अजित पवार म्हणतात, त्यांची घरातील सर्व भावंडे पायाला भिंगरी लावून सुप्रियासाठी फिरतात. आम्ही सर्वच सुप्रियांचे भावंड आहोत. प्रत्येकाला वाटतंय सुप्रिया सुळे यांनी प्रचंड मताधिक्क्यानी विजयी व्हावं. मोदी-शहांच्या नादाला लागून तुम्ही जे राजकारण करता, ते महाराष्ट्राला पटलं नाही. मोदींनी निवडणूक आयोग, सर्व घटनात्मक संस्था आपल्या पायाखाली घेतल्या आहेत, त्या माध्यमातून शिवसेना-फडणवीस गट स्थापन केला. पण ४ जूनला मोदींनी कोण नकली, कोण असली याचं उत्तर मिळेल. निवडणुकीच्या तोंडावर निर्यात बंदी उठवून तुम्ही गुजरातच्या व्यापारांना आणि कांदा उत्पादकांना मालामाल करत आहेत.

महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी माती खायची का, कांदा रस्त्यावर फेकायचा का, शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची का, याबाबत आम्ही आवाज उठवला आहे. महाराष्ट्र पेटून उठला आहे. तुमच्यावर कांदे फेकून मारले असते. चंद्रशेखर बावनकुळेंना २०२९ ला तिकिट नाकारलं, त्यांनी लोकशाहीवर बालू नये. ज्या विदर्भातून बावनकुळे येतात, नागपूरसह सर्व जागांवर मविआचे उमेदवार जिंकतील. बारामतीत तळ ठोका किंवा तंबू ठोका, काहीही होणार नाही. मी लढायला उतरतो, निवडणूक जिंकण्यासाठी. मग २०२९ ला पार्थ पवार का पडले, आपल्या मुलांना त्यांनी विजय मिळवून का दिलं नाही, आता बारामतीत त्यांच्या पत्नीच्या पराभवाची तयारी सुरु झाली आहे.

मुख्यमंत्र्यांचा तथाकथित गड ठाण्यात उमेदवारी जाहीर झाली नाही. कल्याण-डोंबिवलीत सुद्धा अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झाली नाही. शिवसेना-फडणवीस गटाने नाशिकलाही अद्याप उमेदवार दिलेला नाही. तो शिंदे गट नाही, तो शिवसेना-फडणवीस गट आहे. ही मोदी-शहा प्रायव्हेट लिमिटेड आहे. काही ठिकाणी औपचारिकता म्हणून उमेदवार दिले आहेत. काल उत्तर मध्य-मुंबईत सरकारी वकील उज्ज्व निकम यांना उमेदवारी दिलीय. कुणी कितीही मोठ्या घोषणा करु द्या, महाराष्ट्रात आम्ही ३०-३५ च्या आसपास जागा जिंकू, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com