Sanjay Raut
Sanjay Raut

संजय राऊतांची PM नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका, पत्रकार परिषदेत म्हणाले; "मोदींचा खोटं बोलण्याचा जागतिक विक्रम..."

इतकं खोटं बोलणारा प्रधानमंत्री या देशानं पाहिला नाही, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली.
Published by :

Sanjay Raut Press Conference : नरेंद्र मोदी आणि अमित शहा मुंबईची पूर्णपणे लूट करून मुंबईला कंगाल करण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोन्ही नेते प्रादेशिक अस्मिता जपणारे आहेत. म्हणून त्यांनी दोन्ही पक्षांची सरकारे पाडली आणि दोन्ही पक्ष फोडले. मोदी आणि शहांना याची फार मोठी किंमत भविष्यात मोजावी लागेल. महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही. उद्धव ठाकरेंना कधीही मुख्यमंत्रीपदाचा मोह नव्हता आणि आताही नाही. नरेंद्र मोदी गेल्या दहा वर्षात सतत खोटं बोलत आहेत. मोदींचा खोटं बोलण्याचा जागतिक विक्रम लवकरच गिनिज बुकात नोंदवला जाईल. इतकं खोटं बोलणारा प्रधानमंत्री या देशानं पाहिला नाही, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली.

संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले, खोटं बोलण्याचा त्यांचा हा खेळ आहे, त्याला ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करता येईल का, हे पाहावं लागेल. शामाप्रसाद मुखर्जींचा तुम्ही विचार सांगत आहात. ज्याने मुस्लिम लीगसोबत सरकार बनवलं आणि चले जाव आंदोलनाला विरोध केला. चले जाव आंदोलन चिरडून टाका, असं पत्र शामा प्रसाद मुखर्जी यांनी इंग्रजांना लिहिलं होतं. शामा प्रसाद मुखर्जी हा तुमचा वैचारिक वारसा आहे का, एव्हढच आम्हाला सांगा. आम्ही लढणारे लोक आहेत. आम्ही तुमच्यासारखी भ्रष्ट प्रवृत्ती नाही. मोदींवर विश्वास ठेऊ नका, असं मी वारंवार सांगत आहे. ४ जूनला मोदी देशाच्या राजकारणात दिसणार नाहीत.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत तुमचा आणि तुमच्या पक्षाचा अजिबात वाटा नाहीय. वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण, शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंचं महाराष्ट्रात जे योगदान आहे, तेव्हढं तुमचं नाही. लोकांचे पक्ष आणि घरं फोडणं, हे तुमचं राजकारण आहे. देवेंद्र फडणवीसांचं राजकारण भविष्यात फार काळ चालेल, असं वाटत नाही. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात आणि देशात भविष्य नाही. हे मी तोंडावर सांगतोय. मी घाबरत नाही. तुम्ही माझ्या मागे यंत्रणा लावाल ना, लावा मग. आमच्या नादाला लागू नका, मग तुमच्या नादाला लागण्याचा प्रश्नच येत नाही. जिथे जिथे आम्हाला गद्दारांना गाडण्याची संधी मिळते, तिथे आम्ही अत्यंत खूश आहोत. १२ ते १३ ठिकाणी जे गद्दार आमच्याविरोधात उभे आहेत, त्यांना गाडण्याची संधी आम्हाला मिळतेय.

त्याबद्दल आम्ही शिवसेना-फडणवीस गटाचं स्वागत करतो. मोदी यांची भ्रष्टाचारविरोधी बोंब आहे, ती बोंब नसून पोकळ बांग आहे. देशाच्या भ्रष्टाचारी लोकांना मांडीवर घेऊन मोदी भ्रष्टाचारविरोधी लढाई करत आहेत का, धमकी बहाद्दर म्हणून अजित पवारांची ख्याती आहे. रोज दहा लोकांना ते धमक्या देत आहेत. तुम्ही वैचारिक विधाने करु नका, तुम्हाला शोभत नाही. सरकारने निर्यात बंदी उठवण्याची घोषणा केली, त्याचा पहिला उद्देश होता, गुजरातच्या व्यापारांना फायदा व्हावा. या संपूर्ण व्यवहारातून मोदींनी गुजरातच्या ठेकेदारांचा फायदा करून दिला आहे, असंही राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com