'गणपती आले अन् नाचून गेले’ राऊतांचा सरकारवर घणाघात
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज बैठक पार पडली. य़ा बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत निर्णय जाहीर करण्यात आले. यावरच शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी 'मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ज्या घोषणा केल्या, त्यातून मराठवाड्याला नेमके काय मिळाले? सामान्य माणूस, शेतकऱ्यांना या घोषणांमधून काय मिळाले? हे तर असे झालं गणपती आले अन् नाचून गेले’ अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते म्हणाले की, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतून मराठवाड्याच्या जनतेला काय मिळाले? हा खरा प्रश्न आहे. वर्ष २०१६ मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ५० हजार कोटींची घोषणा केली होती. आता ४६ हजार कोटींच्या योजनांची घोषणा केली आहे. फक्त घोषणा करण्यासाठीच एवढा पैसा खर्च केला का? किती पैसे खर्च केले, याचा हिशेब द्या. मराठवाड्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. पण, मंत्री फक्त ताफे घेऊन फिरत आहेत. रस्ते बंद केले जात आहेत, यांना आता लोकांची भीती वाटायला लागली आहे’’ असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
पुढे ते म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव केल्याचे श्रेय हे सरकार घेत आहे. पण, संभाजीनगर हे महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनीच केले. त्यामुळे याचे खरे श्रेय ठाकरेंचे आहे’’, असा दावाही संजय राऊत यांनी केला.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत एक पत्रकार म्हणून उपस्थित राहणार होते मात्र ते गैरहजर होते. यावरच राऊतांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला मी हजर राहणार असे सांगितले आणि ते अस्वस्थ झाले. पण, मी जाणे टाळले आणि त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. माझ्यावर लक्ष ठेवायला खास पोलिस ठेवले होते. असं ते म्हणाले.