Sanjay Raut On Mahesh Kothare : महेश कोठारेंच्या 'त्या' पहिल्या राजकीय वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया म्हणाले; "...तुमचा गळा दाबेल"
थोडक्यात
एका सांस्कृतिक कार्यक्रमात दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
कोठारे यांनी “मी मोदीजींचा भक्त आहे, मी भाजपचा भक्त आहे” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं प्रचंड कौतुक केलं.
शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत कोठारेंना चिमटा काढला आहे.
Sanjay Raut On Mahesh Kothare First Poltical statment : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित एका सांस्कृतिक कार्यक्रमात दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. कोठारे यांनी “मी मोदीजींचा भक्त आहे, मी भाजपचा भक्त आहे” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं प्रचंड कौतुक केलं. त्याचबरोबर मुंबई महापालिका निवडणुकीत “कमळच फुलेल आणि मुंबईत भाजपचाच महापौर होईल” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कोठारे यांच्या या विधानावर संपूर्ण सोशल मीडियावर आणि राजकीय चर्चेतून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. काहींनी त्यांचं समर्थन केलं, तर अनेकांनी कलाकार म्हणून राजकीय भूमिका घेणं योग्य नसल्याचं मत व्यक्त केलं. यावर आता शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत कोठारेंना चिमटा काढला आहे. मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले, “महेश कोठारे नक्की मराठीच आहेत ना, मला थोडी शंका वाटते. प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, पण तुम्ही कलाकार आहात, आणि तुमचे चित्रपट फक्त भाजपच्या लोकांनी पाहिलेले नाहीत.”
यानंतर राऊत यांनी विनोदी शैलीत म्हणत कोठारेंना उद्देशून टोला लगावला. “तुम्ही असं काही बोललात तर तुम्हाला तात्या विंचू चावेल, रात्री येऊन तुमचा गळा दाबेल!” त्यांच्या या वक्तव्यावर सभेत उपस्थितांमध्ये हास्य निर्माण झाले. कोठारे यांनी बोरिवलीत प्रवीण दरेकर यांच्या दिवाळी पहाट कार्यक्रमात हे विधान केलं होतं. कार्यक्रमादरम्यान महेश कोठारे यांनी भाजप आणि मोदींचं कौतुक करत म्हटलं, “जेव्हा मी पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी आलो होतो, तेव्हा मी म्हटलं होतं, हे खासदार निवडून देत नाहीत, मंत्री निवडून देत आहेत. आता या विभागातून नगरसेवक नाही तर महापौर नक्कीच निवडला जाईल.”
कोठारे यांच्या वक्तव्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा नवा मुद्दा निर्माण झाला आहे. काहींनी त्यांच्या प्रामाणिक मतप्रदर्शनाचं स्वागत केलं असलं तरी, काही जणांनी “कलाकारांनी राजकीय भूमिका टाळावी” अशीही टीका केली आहे.