Sanjay Shirsat On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी भेटायला बोलावलं तर नक्की जाईल, संजय शिरसाटांच वक्तव्य
शिवसेना (शिंदे गट) नेते आणि राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी पुण्यात खळबळजनक विधान करत सांगितलं की, "उद्धव ठाकरे बोलावतील तर मी नक्कीच भेटायला जाईन." त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. शिरसाट म्हणाले की, "ठाकरे कुटुंब एकत्र यावं, यासाठी आमच्या शुभेच्छा आहे." त्यांनी हेही स्पष्ट केलं की, राजकीय मतभेद असले तरी नातेसंबंध वेगळे असतात आणि ते जपणं महत्त्वाचं आहे.
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नुकतीच झालेली भेट, त्यात झालेल्या चर्चांबद्दल बोलताना शिरसाट यांनी सांगितलं की, "अजित पवार आणि शरद पवार यांच्यातही भेटीगाठी होत असतात. त्यामुळे जर उद्धव ठाकरेही बोलावले, तर मी त्यांना भेटायला जाईन. या भेटीला राजकीय अर्थ लावणं चुकीचं ठरेल". पुढे ते म्हणाले, "राज साहेब, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील भेटतात. त्यामुळे अशा भेटीगाठींना वेगळा अर्थ देऊ नये. राजकारणाव्यतिरिक्त काही नातीही महत्त्वाची असतात."
शिरसाट यांनी स्पष्ट केलं की, "राजकीय चर्चाही या भेटीत होत असतील, पण त्याविषयी माहिती देण्याचा अधिकार संबंधित नेत्यांचाच आहे." त्यांच्या या विधानामुळे शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटामधील संबंधांविषयी नवा पेच निर्माण झाला आहे.