Santosh Ladda Robbery Case : मोठी अपडेट! एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीकडे सापडलं 22 तोळं सोनं; रोहिणी खोतकर अटकेत
छत्रपती संभाजीनगरमधील संतोष लड्डा दरोडा प्रकरणात आता एक मोठं वळण आलं आहे. या प्रकरणात एन्काउंटरमध्ये ठार झालेल्या मुख्य आरोपी अमोल खोतकर याची बहीण रोहिणी खोतकर हिला पोलिसांनी अटक केली आहे. तिच्या घरातून 22 तोळे सोनं आणि 7 जीवंत काडतुसं हस्तगत करण्यात आली आहेत.
चोरीचा मुद्देमाल रोहिणीच्या घरीच?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिणी खोतकरच्या घरावर छापा टाकल्यानंतर चोरीस गेलेल्या सोन्याचा एक भाग 22 तोळे सोनं सापडलं. त्याचबरोबर 7 जीवंत काडतुसे देखील आढळली. काही दिवसांपूर्वी तिच्याच सांगण्यावरून पोलिसांनी 30 किलो चांदी एका गॅरेजमध्ये पार्क केलेल्या गाडीतून हस्तगत केली होती. आता तिच्या घरातूनच सोनं सापडल्याने रोहिणीचा या दरोड्यात थेट सहभाग असल्याचा संशय बळावला आहे.
काय आहे दरोड्याचं प्रकरण?
काही आठवड्यांपूर्वी संतोष लड्डा यांच्या घरी मोठा दरोडा टाकण्यात आला होता. या घटनेत 5.5 किलो सोनं, 32 किलो चांदी, आणि 70 हजार रुपये रोख चोरून नेण्यात आले होते. तपासात हा गुन्हा पूर्वनियोजित आणि गुन्हेगारी टोळीने रचल्याचं निष्पन्न झालं.
मुख्य आरोपी अमोल खोतकर याने अटक टाळण्यासाठी पोलिसांवर गोळीबार केला होता. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्याचा मृत्यू झाला होता. यानंतर त्याची बहीण रोहिणीने पोलिसांवर आरोप केले होते. पण आता तिच्याच घरातून चोरीचा मुद्देमाल सापडल्याने ती स्वतः संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.
कट रचणाऱ्यांची साखळी
या प्रकरणात अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लड्डा यांचे मित्र बाळासाहेब इंगोले यांनी घरात कोट्यवधींची रोकड असल्याची माहिती पसरवली होती. त्याने ही रक्कम चोरी करण्यासाठी टोळी जमवली होती. त्यासाठी जादूटोणाचा आधार घेण्याचा विचार केला होता. पण त्याच्याआधीच ही माहिती हासबे नावाच्या आरोपीकडे पोहोचली. त्याने आपल्या टोळीच्या मदतीने दरोडा टाकला.
अटकसत्र सुरूच, तपास गतीत
या प्रकरणात आत्तापर्यंत 20 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांचा संशय आहे की, रोहिणी खोतकरकडून मिळालेलं सोनं आणि चांदी हेच दरोड्याच्या मुद्देमालाचा भाग आहेत. तिच्या अटकेनंतर इतर आरोपींबाबत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. पोलिस तपास वेगाने सुरू असून, लवकरच आणखी खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.