Shivsena : महायुतीतील पक्षबदलांवर सरनाईक यांचे स्पष्टीकरण; नाराजीची चर्चा फेटाळली

Shivsena : महायुतीतील पक्षबदलांवर सरनाईक यांचे स्पष्टीकरण; नाराजीची चर्चा फेटाळली

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागताच राज्यभरात पक्षबदलाचे प्रमाण वाढले आहे. महायुतीतील काही माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते एकमेकांच्या पक्षात प्रवेश करत असल्याने भाजप आणि शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा रंगली
Published by :
Riddhi Vanne
Published on

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागताच राज्यभरात पक्षबदलाचे प्रमाण वाढले आहे. महायुतीतील काही माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते एकमेकांच्या पक्षात प्रवेश करत असल्याने भाजप आणि शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा रंगली. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी (18 नोव्हेंबर) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे गटातील मंत्र्यांनी अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले.

यानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संपूर्ण घडामोडीवर भाष्य करताना नाराजीची चर्चा फेटाळली. त्यांनी सांगितले की, “महायुती सरकारमध्ये सर्व घटक पक्षांमध्ये संवादातून गोष्टी सोडवल्या जातात. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे काही मुद्द्यांवर चर्चा केली आणि तत्काळ त्यावर निर्णयही झाला.”

सरनाईक यांनी स्पष्ट केले की, महायुतीतील कोणताही पक्ष आता इतर घटक पक्षांकडील पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधींना घेणार नाही. प्रदेशाध्यक्षांच्या स्तरावर याबाबत पुढील नियोजन करण्यात येणार आहे. “ही नाराजीची बाब नाही. निवडणुकीपूर्वी पक्षांतर वाढते, त्यामुळे थोडेसे गैरसमज निर्माण झाले होते. पण दोन्ही बाजूंनी ते दूर करण्यात आले,” असे ते म्हणाले. तसेच, काही निर्णय समन्वयाअभावी नकळत होत असल्याचे त्यांनी मान्य केले. “मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांवर कोणीही रागावलेले नाही. सर्व निर्णय सौहार्दाने आणि सकारात्मक वातावरणात झाले,” असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com