Satish Shah : ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांच्या अंत्यसंस्कारवेळी अभिनेत्यांनी कोणतं गाणं गायलं; अशी का वाहिली श्रद्धाजंली
थोडक्यात
ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे शनिवारी वयाच्या 74व्या वर्षी किडनी निकामी झाल्याने निधन झाले.
रविवारी मुंबईतील पवन हंस स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. त्यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली.
सतीश शाह यांना अंतिम निरोप देताना संपूर्ण टीमने मालिकेचं टायटल सॉन्ग गाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.
ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे शनिवारी वयाच्या 74व्या वर्षी किडनी निकामी झाल्याने निधन झाले. रविवारी मुंबईतील पवन हंस स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. त्यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली. सतीश शाह यांनी आपल्या दीर्घ अभिनय कारकिर्दीत अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या, पण त्यांना खरी ओळख मिळाली ती 'साराभाई वर्सेस साराभाई' या लोकप्रिय मालिकेतील इंद्रवदन साराभाई या भूमिकेमुळे.
अंत्यसंस्कारावेळी मालिकेतील कलाकार सुमित राघवन, रूपाली गांगुली, राजेश कुमार, तसेच निर्माते जेडी मजेठिया, दिग्दर्शक देवेन भोजानी आणि लेखक-दिग्दर्शक आतिश कपाडिया उपस्थित होते. सतीश शाह यांना अंतिम निरोप देताना संपूर्ण टीमने मालिकेचं टायटल सॉन्ग गाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.
देवेन भोजानी यांनी या प्रसंगाबद्दल सांगितलं, “हे थोडं वेगळं वाटेल, पण आम्ही नेहमी एकत्र हे गाणं गातो. आजही तसंच केलं, जणू इंदुनेच आम्हाला ते गाणं गाण्यास सांगितलं.” अभिनेता राजेश कुमार यांनीही भावनिक पोस्ट शेअर करत लिहिलं, “साराभाईचं गाणं गायलं नाही तर निरोप अपूर्ण राहिला असता. लॉन्ग लिव्ह इंदु!” सतीश शाह यांच्या निधनाने भारतीय दूरचित्रवाणी आणि चित्रपटसृष्टीने एक बहुमूल्य कलाकार गमावला आहे.

