Money Doubling Scam : 'पैसे दुप्पट होतील'; असं सांगत शिर्डीत तब्बल 300 कोटींचा घोटाळा, आरोपीला बेड्या
शिर्डीमध्ये पैशांचा मोठा घोटाळा समोर आला आहे. "ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीने शिर्डीसह इतरही जिल्ह्यातील अनेकांना गंडा घालत पैशांची मोठी फसवणूक केली आहे. तब्बल 300 कोटींपेक्षा जास्त पैशांचा हा घोटाळा असून या प्रकरणी भूपेंद्र राजाराम सावळे पाटील याला अटक करण्यात आली आहे.
पैसे दुप्पट करण्याचे फसवे आमिष दाखवून लाखो लोकांना लुटण्याचे प्रकार अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अशाच एका फसव्या भूपेंद्रने शिर्डीसह आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये लोकांना लुबाडून त्यांना पैसे डबल करतो, असे आमिष देत चक्क 1 नाही 2 नाही तर तब्बल 300 कोटींचा महाघोटाळा केला आहे. भूपेंद्र सावळे याने आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या मदतीने शेकडो लोकांना लुबाडले आहे. या ठगांच्या मागे लागून अनेकांनी आपल्या वर्षानुवर्षे साठवलेल्या पैशांवर पाणी सोडले आहे. शिर्डीच्या साई संस्थानच्या शेकडो कर्मचाऱ्यांनाही याने भुलवल्याचे चित्र आहे. शिर्डीमधील साई संस्थानच्या बऱ्याच कामगारांनी कर्मचारी सोसायटीतून कर्ज काढून भूपेंद्रकडे पैसे गुंतवले. त्यानेही एका वर्षात पैसे डबल करून देतो, अशी आश्वासने दिली.
सुरुवातीला कामगारांना याच्यावर विश्वास बसला. काही वृद्ध कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवानिवृत्तीचे पैसे ही यांच्याकडे गुंतवले होते. मात्र वर्ष झाले तरी त्याच्याकडून काहीच परतावा न आल्याने सर्वांनी त्याला जाब विचारला. सुरुवातीला आता देतो नंतर देतो, अशी त्याने उत्तरे दिली. अखेर आपली फसवणूक झाली आहे, हे लोकांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे तक्रार करायचे ठरवले. पण तुम्ही तक्रार केली तर पैसे मिळणार नाहीत, अशी त्याने सगळ्यांना धमकी दिली. पैसे मिळतील, या आशेने लोकांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही. फेब्रुवारी ते जून या काळात त्याने आपला साखरपुडा केला आणि त्यात त्याने अमाप पैसा खर्च केला, याचा एक व्हिडीओ लोकांसमोर आला. अखेर कामगारांनी त्याच्याविरुद्ध शिर्डी आणि राहाता येथे गुन्हे दाखल केले.
दरम्यान, या ठगाच्या शोधात असताना तो आणि त्याचे वडील यांसह अनेक नातेवाईकही यामध्ये सामील असल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले. पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलिसांनी परराज्यातून त्याला अटक केली. यामध्ये शिर्डीत साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांसह इतरांची 1 कोटी 65 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. यामुळे अशा आमिषांना बळी पडू नका, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.