Parth Pawar Land Scam  : पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात शितल तेजवाणीचा शोध सुरु

Parth Pawar Land Scam : पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात शितल तेजवाणीचा शोध सुरु

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित जमीन व्यवहार प्रकरणात नवीन घडामोडी समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य संशयित शितल तेजवाणीचा शोध सध्या बावधन पोलिसांकडून घेतला जात आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात शितल तेजवाणीचा शोध सुरु

  • पिंपरी-चिंचवडमधील ऑफिसला टाळं

  • सरकारी जमिनीचा आरोप आणि स्टॅम्प ड्युटी बुडवली

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित जमीन व्यवहार प्रकरणात नवीन घडामोडी समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य संशयित शितल तेजवाणीचा शोध सध्या बावधन पोलिसांकडून घेतला जात आहे. शितल तेजवाणी यांनी संबंधित जमीन व्यवहारात वापरलेल्या कुलमुक्तार पत्रातील पत्ता ‘पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी’चा असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. मात्र, सध्या या कंपनीच्या कार्यालयाला टाळं लागलेलं असून पोलिसांसमोर शितल तेजवाणीचा ठावठिकाणा शोधणे हे एक मोठं आव्हान बनलं आहे. शितल तेजवाणीच्या अटकेनंतर पार्थ पवारांचा या जमीन व्यवहारातील भूमिका अधिक स्पष्ट होण्याची शक्यता असल्याचं पोलिस सूत्रांकडून समजते.

पिंपरी-चिंचवडमधील कार्यालयाला टाळं

शितल तेजवाणीचे कार्यालय पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोरील ‘द ज्वेल्स ऑफ पिंपरी प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी’च्या ए-23 या शॉपमध्ये होते. या ठिकाणी ‘पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ नावाने त्या कंपनी चालवत होत्या. काही दिवसांपूर्वीपर्यंत हे कार्यालय सुरू असले तरी आता येथे कुलूप ठोकण्यात आले आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, शितल तेजवाणी या मुंढवा परिसरातील अंदाजे 40 एकर वतनजमिनीच्या विक्रीत सामील होत्या. ही जमीन त्यांनी कुलमुक्तारनामा वापरून पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया कंपनी’ला विकल्याची माहिती समोर आली आहे.

सरकारी जमिनीचा आरोप आणि स्टॅम्प ड्युटी बुडवली

या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर स्टॅम्प ड्युटी बुडवण्यात आल्याचा आरोप आहे. याशिवाय, विक्री केलेली जमीन ही सरकारी मालकीची असल्याची शक्यता तपासली जात आहे. या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर भावधन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यात शितल तेजवाणी, दिग्विजयसिंग पाटील आणि रवींद्र तारुया या तिघांची नावे संशयित म्हणून नमूद करण्यात आली आहेत.

पार्थ पवारांच्या भूमिकेकडे लक्ष

या व्यवहारात पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया कंपनी’चा थेट संबंध असल्याने आता या प्रकरणात त्यांचा सहभागही तपासाअंतर्गत येण्याची शक्यता वर्तवली जाते. पोलिस शितल तेजवाणीचा शोध घेत आहेत आणि तिच्या चौकशीनंतर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार व आर्थिक व्यवहाराचे तपशील स्पष्ट होऊ शकतात.

पुढील तपास सुरू

सध्या पोलिसांनी या प्रकरणातील सर्व संबंधित दस्तऐवज, कुलमुक्तारनामा, स्टॅम्प ड्युटी रेकॉर्ड आणि जमीन महसूल कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. यानंतर पुढील कारवाई आणि संभाव्य अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com