Jaipur Accident : जयपूरमध्ये भीषण अपघातात संपुर्ण कुटुंब उध्वस्त! हरिद्वारहून अस्थी विसर्जन करून परतत असताना...
जयपूरच्या शिवदासपूरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी पहाटे घडलेल्या एका भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. हरिद्वार येथे अस्थी विसर्जन करून परतणाऱ्या कुटुंबाच्या कारचा हा अपघात असून, मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. या दुर्घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
शनिवारी उशिरा रात्री ही दुर्घटना झाली. कार रिंग रोडखालील नाल्यात कोसळून पाण्यात बुडाली होती. रात्रीच्या अंधारामुळे घटनेची माहिती मिळाली नाही. रविवारी दुपारी सुमारे 12.30 वाजता स्थानिकांना कार नाल्यात दिसली आणि त्यांनी पोलिसांना कळवले.
पोलिसांनी तातडीने कार बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेतली. कार उघडताच आत तीन पुरुष, दोन महिला आणि दोन लहान मुले मृत अवस्थेत आढळले. सर्वजण अपघातात कारमध्येच अडकून मृत्युमुखी पडले होते.
ओळखपत्रांच्या आधारे मृतक जयपूर आणि भीलवाडा (शाहपुरा) परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही मंडळी हरिद्वारहून परतत असताना चालकाचा ताबा सुटल्याने कार अनियंत्रित होऊन नाल्यात गेल्याचे प्राथमिक तपासात दिसून येते.
सर्व मृतदेह पोस्टमार्टेमसाठी मोर्चरीत हलवण्यात आले आहेत. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार, वाहनावरील नियंत्रण सुटणे किंवा रात्री कमी दृश्यमानता ही कारणे असू शकतात. या दुर्घटनेने एकाच कुटुंबातील सात जणांचा अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.