Shailesh Jejurikar : अभिमानास्पद! शैलेश जेजुरीकर बनले P&G चे CEO; 2026 पासून स्वीकारणार जबाबदारी
भारताचे सुपुत्र शैलेश जेजुरीकर यांची जगप्रसिद्ध FMCG कंपनी प्रॉक्टर अँड गॅम्बल (P&G) च्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2026 पासून ते सध्या हंगामी CEO असलेल्या जॉन मोएलर यांची जागा घेतील. गेली 6 वर्षे COO म्हणून कंपनीच्या जागतिक कामकाजाची धुरा सांभाळणाऱ्या जेजुरीकर यांच्या नेतृत्वावर आता पूर्ण कंपनीची जबाबदारी येणार आहे.
58 वर्षीय शैलेश जेजुरीकर यांनी 1989 मध्ये सहाय्यक ब्रँड मॅनेजर या पदावरून P&G मध्ये कामास सुरुवात केली. तीन दशके विविध विभागांत काम करत त्यांनी कंपनीत मजबूत स्थान निर्माण केले. फॅब्रिक केअर, होम केअर, ग्लोबल बिझनेस सर्व्हिसेस, Supply Chain आणि IT यासारख्या महत्त्वाच्या विभागांत त्यांचे नेतृत्व निर्णायक ठरले आहे.
शैलेश जेजुरीकर यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठ आणि IIM लखनौ येथून झाले आहे. सध्या ते पत्नी सांख्या जेजुरीकर (दृश्यकलावंत) आणि दोन मुलांसह अमेरिकेत राहतात. त्यांच्या कुटुंबाची व्यावसायिक पार्श्वभूमीसुद्धा उल्लेखनीय आहे. त्यांचे मोठे बंधू राजेश जेजुरीकर हे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे कार्यकारी संचालक आणि CEO (ऑटो व फार्म सेक्टर) आहेत.
P&G च्या 183 वर्षांच्या इतिहासात ही केवळ दुसरी वेळ आहे की, कंपनीने अमेरिकेबाहेरील व्यक्तीला CEO पद दिले आहे. 1998 मध्ये नेदरलँड्सचे डर्क जॅगर हे पहिले असे CEO होते. त्यामुळे ही निवड ऐतिहासिक ठरत आहे.
जगभरातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये भारतीय मूळ असलेल्या नेतृत्वाची संख्या वाढताना दिसत आहे. Microsoft चे सत्या नडेला, Google चे सुंदर पिचाई, Adobe चे शंतनु नरायण आणि IBM चे अर्विंद कृष्णा यांच्यासारख्या नावांमध्ये आता शैलेश जेजुरीकर यांचेही नाव सामील झाले आहे.
या नियुक्तीवर महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवरून विशेष आनंद व्यक्त करत, “शैलेश हे आमचे कार्यकारी संचालक राजेश यांचे बंधू असल्याने ही नेमणूक आमच्यासाठीही खास आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. शैलेश जेजुरीकर यांची ही भरारी भारतीय तरुणांसाठी प्रेरणादायक ठरत आहे.