Pune : पुण्यात काका- पुतण्या एकत्र?
Sharad Pawar Ajit Pawar Alliance in Pune Corporartion : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस आता पुन्हा एकत्र येण्याच्या तयारीत आहे. दोन्ही गटांच्या बैठकांचा जोरदार सिलसिला सुरू आहे, आणि येत्या दोन दिवसांत त्याबाबत महत्त्वाची घोषणा केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. कार्यकर्त्यांना ते म्हणाले की, आगामी निवडणुकीत एकत्र लढण्याबाबत मी स्वतः खुलासा करणार आहे. या विषयावर दोन दिवसांत निर्णय जाहीर केला जाईल.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप विरोधात एकत्र येण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. या संदर्भात, अजित पवार यांनी काँग्रेसचे माजी मंत्री सतेज पाटील यांच्याशी पुणे महापालिकेत एकत्र येण्याच्या बाबत प्राथमिक चर्चा केल्याचे समजले आहे. आज झालेल्या बैठकीत दोन्ही गटांच्या नेत्यांनी एकत्र लढण्यावर सकारात्मक चर्चा केली असून महाविकास आघाडीतील इतर मित्रपक्षांसोबत देखील युती करण्याची तयारी आहे, असे स्पष्ट झाले आहे. यावर अंतिम निर्णय वरिष्ठ स्तरावर घेतला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी आज एक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, ज्यावर सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांच्यासोबत चर्चा केली जाणार आहे. कार्यकर्त्यांसोबत बैठका घेऊन अंतिम निर्णय जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले. दोन्ही पक्षांच्या नेत्यांची रात्री बैठक झाली. त्यात एकत्र लढण्यावर सहमती मिळाली असून जागावाटपातही थोड्या-थोड्या गोष्टींमध्ये समायोजन केले जाईल. या अनुषंगाने तयारी सुरु असून येत्या २५ किंवा २६ तारखेला युतीची घोषणा केली जाणार आहे, असे अजित पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष सुभाष जगताप यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसने जबाबदारींचे वितरण करत मुंबईसाठी आमदार रोहित पवार, पुण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि पिंपरी-चिंचवडसाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना जबाबदारी दिली आहे. तसेच 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी प्रभारी नेत्यांची यादी देखील जाहीर केली आहे.
शशिकांत शिंदे म्हणाले, “पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी अजित पवार गटासोबत आघाडी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या संदर्भात चर्चा झाली असून, कार्यकर्त्यांचा न्याय होईल अशा प्रकारे निर्णय घेतला जाईल.”

