NCP Rakhi Jadhav : शरद पवार गटाला मोठा धक्का; राखी जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश
मुंबईच्या राजकारणात एक महत्त्वाचा बदल घडताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची मुंबईतील धुरा सांभाळणाऱ्या आणि पक्षाच्या संघटनात्मक कामात सक्रिय असलेल्या राखी जाधव लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा निर्णय शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शरद पवार गटाने ठाकरे बंधूंशी हातमिळवणी केली आहे. मात्र या युतीत राष्ट्रवादीला फारच कमी, म्हणजे अवघ्या 5 ते 10 जागा मिळाल्याची चर्चा आहे. या मर्यादित जागांमुळे मुंबईत पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या राखी जाधव यांच्यावर कार्यकर्त्यांचे प्रश्न आणि नाराजीचा सामना करावा लागत होता. कमी जागा मिळाल्याने त्या अस्वस्थ झाल्या होत्या आणि याच पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राखी जाधव सोमवारी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करतील. घाटकोपरमधील त्यांच्या प्रभागातून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यांच्या या निर्णयामुळे शरद पवार गटाला मुंबईत मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे.
राखी जाधव या अनेक वर्षांपासून मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत होत्या. शहरात पक्षाची ताकद मर्यादित असतानाही त्या कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवून संघटना टिकवून ठेवण्याचे काम करत होत्या. मात्र महापालिका निवडणुकीत अत्यल्प जागा मिळाल्यामुळे त्यांची नाराजी वाढली.
सूत्रांच्या माहितीनुसार, याबाबत चर्चा केल्यानंतर वरिष्ठांकडून काही इच्छुक उमेदवारांना अजित पवार गटात जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी नगरसेवक धनंजय पिसाळ, मनीष दुबे, यामिनीबेन पंचाल, नितीन देशमुख आणि अशोक पांचाल यांच्यासह अनेकांनी आधीच पक्ष बदलला आहे. अजूनही काही इच्छुक उमेदवार लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. या सगळ्या घडामोडींमुळे राखी जाधव अधिकच नाराज झाल्या आणि अखेर त्यांनी भाजपची वाट निवडल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
थोडक्यात
मुंबईच्या राजकारणात महत्त्वाचा बदल घडत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची मुंबईतील धुरा सांभाळणाऱ्या राखी जाधव भाजपमध्ये जाणार आहेत.
राखी जाधव पक्षाच्या संघटनात्मक कामात सक्रिय होत्या.
हा निर्णय शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
राजकीय वर्तुळात यामुळे चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.

