Sharad Pawar
Sharad Pawar

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा

मोदींनी अनेक निर्णय घेतले पण ते निर्णय सामान्य माणसांच्या भल्यासाठी नाहीत, असं म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. ते सुप्रिया सुळे यांच्या प्रचारसभेत भोर येथे बोलत होते.
Published by :

Sharad Pawar On Narendra Modi : ३०० वर्षांपेक्षा जास्त वर्ष होऊन गेली आणि इतकी वर्ष झाल्यानंतर कोणत्या राजाचं नाव जनतेच्या अंत:करणात आहे, देशात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव लोकांच्या लक्षात आहे. दिल्लीत मुघलांचं राज्य होतं, पण महाराष्ट्राचं राज्य हिंदवी स्वराज्य आहे. हे रयतेचं राज्य आहे. हे जनतेचं राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली आहे. आज लोकशाही आहे आणि या लोकशाहीचा अधिकार नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे. सत्ता आल्यानंतर या सत्तेचा वापर जनतेची सेवा करण्यासाठी होईल, असं वाटलं होतं. पण तसं काही घडलं नाही. त्यांची इच्छा असेल त्या पद्धतीने राज्य चालवण्याचं काम मोदी करत आहेत. मोदींनी अनेक निर्णय घेतले पण ते निर्णय सामान्य माणसांच्या भल्यासाठी नाहीत, असं म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. ते सुप्रिया सुळे यांच्या प्रचारसभेत भोर येथे बोलत होते.

मोदी सरकारवर टीका करत पवार म्हणाले, लोकशाहीत लोकांनी काही राज्ये निवडली. झारखंडमध्ये आदिवासींची लोकसंख्या आहे. तिथे आदिवासी मुख्यमंत्री आहेत. पण आज देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ते राज्य एका दिशेनं आपल्या हातात घेतलं. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना सत्तेतून बाजूला काढलं. दिल्ली देशाची राजधानी आहे. या राजधानीत अरविंद केजरीवाल राज्यकर्ते आहेत. दिल्ली केजरीवालांच्या कारभारावर खूश आहेत. केजरीवालांनी केंद्र सरकारवर टीका केली आणि त्याचा परिणाम काय झाला, आज केजरीवाल तुरुंगात आहेत.

मोदी सरकार सत्तेचा गैरवापर करुन लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींना तुरुंगात टाकत आहे आणि हा देश हुकूमशाहीच्या रस्त्याने नेत आहे. हे सूत्र हातात घेऊन मोदी पुढची पावले टाकत आहेत. त्यांना उत्तर द्यायचं असेल, तर या निवडणुकीत त्यांचा शंभर टक्के पराभव करा. त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. सुप्रिया सुळेंना तुम्ही तीनवेळा निवडून दिलं. आता पुन्हा एकदा तुम्ही त्यांना निवडून द्याल, याची मला खात्री आहे. हे राज्य कसं चालवायचं, याचा आदर्श तुमच्या समोर आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, सुप्रिया सुळेंना मोठ्या मताधिक्क्यानं विजयी करा, असं आवाहनही शरद पवार यांनी केलं आहे.

गेले काही दिवस मी महाराष्ट्रात फिरतोय. जवळपास ३०-४० मतदारसंघात मी गेलो आणि आपली भूमिका मांडली. मला आनंद आहे, कित्येक ठिकाणी आम्हाला लोकांचा चांगल्या प्रकारे पाठिंबा मिळत आहे. या देशात अनेक राजे, महाराजे येऊन गेले. त्यांनी इतिहास निर्माण केला आणि तो इतिहास हजारो वर्षे टीकला. या भागातही इतिहास निर्माण झाला आहे. या इतिहासात तुमच्या कुटुंबातील सर्वांचं योगदान आहे. हे राज्य जगात एका वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं. हे राज्य कुणाचं आहे, असं विचारतात, हे राज्य जनतेचं आहे, असंही शरद पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com