'पक्षामध्ये कोणतीही फूट नाही', शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर दाखल
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने केलेल्या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगात उत्तर दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये कोणतीही फूट नाही, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष एकत्र आहेत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार यांच्या पाठीमागे उभा आहे. असं सांगण्यात आलंय. त्यामुळे काका-पुतण्यातील राजकारणाबद्दल अनेक चर्चाना उधाण आलं आहे.
शरद पवार गटाकडून अजित पवार गटाच्या याचिकेसंदर्भात ७ सप्टेंबरला निवडणूक आयोगात उत्तर दाखल करण्यात आलं. त्यात म्हटलंय की, वैयक्तिक स्वार्थासाठी काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आहे. पक्षामध्ये कसलीही फूट पडलेली नाही. अजित पवार यांनी घेतलेली भूमिका विरोधाभासी असल्याचं उत्तरात म्हटलेलं आहे.
अजित पवार गटाच्या दाव्यांना कोणताही कायदेशीर अथवा भौतिक आधार नाही. काही लोकांनी वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्ष अजूनही एकसंध असून शरद पवार यांच्या पाठीशी उभा आहे. निवडणूक आयोग आपले कर्तव्य निःपक्षपातीपणे पार पाडेल, असा देखील विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे.
शरद पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या उत्तराने खरा पक्ष नेमका कुणाचा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.