Ajit Pawar VS Sharad Pawar : राष्ट्रवादी नक्की कोणाची? सर्वोच्च न्यायालयात उद्या होणार निर्णय
विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांना घवघवीत यश मिळाले तर शरद पवारांना पराभव पचवावा लागला. मात्र अद्याप राष्ट्रवादी कोणाची ? असा प्रश्न उपस्थित होताना दिसतो. यामुळे आता 25 मार्च रोजी राष्ट्रवादीच्या पक्षासंदर्भात न्यायालयात सुनावणी होणार आहे .
अजित पवार मोठ्या संख्येने आमदार घेऊन पक्षातून बाहेर पडले. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट तयार झालेले बघायला मिळाले. अशातच जयंत पाटील यांनी पक्षाचे नाव आणि चिन्ह या संदर्भात याचिका दाखल केली होती. याबद्दल आता 25 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ही सुनावणी दुपारी 12 वाजल्यानंतर होईल अशी माहितीदेखील समोर आली आहे.
अजित पवार यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये घडयाळ चिन्हावर निवडणूक लढवली. तसेच शरद पवार यांना तुतारी हे चिन्ह मिळाले होते. अजित पवार गटाने सर्वाधिक 41 जागा जिंकल्या होत्या. तर शरद पवार गटाला फक्त 7 जागांवर समाधान मानावं लागलं. त्याचप्रमाणे आता स्थानिक निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे, त्याआधी राष्ट्रवादी कुणाची? याचा निर्णय सुप्रीम कोर्टात लागण्याची शक्यता आहे.