महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचे स्वबळाचे संकेत; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काल मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यातून बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचे संकेत दिलेत.
उद्धव ठाकरे म्हणाले की, काही काळामध्ये महापालिका निवडणुका येणार आहेत. मी सगळ्यांशी बोलतो आहे. सगळ्यांचे मत आहे की एकटे लढा. अजून निवडणूक जाहीर झालेली नाही. पण मला तुमची जिद्द बघू द्या, तुमची तयारी बघू द्या. ज्या भ्रमात आपण राहिलो. त्या भ्रमातून पहिलं बाहेर या. ज्या क्षणी माझी खात्री पटेल आपली तयारी झाली. मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगत असाल तर जेव्हा वेळ येईल तेव्हा मी एकटा लढण्याचा निर्णय नक्की घेतल्याशिवाय राहणार नाही. असे उद्धव ठाकरे म्हणाले.
यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले की, ते दोन दिवसांपूर्वी माझ्याकडे आले होते त्यावेळी सविस्तर चर्चा झाली. त्यांनी काल जे काही सांगितले तसे त्यांचे मत आहे. पण त्याच्यासाठी एकदम टोकाची भूमिका त्यांच्याकडून घेतली जाईल असं मला वाटत नाही. असं शरद पवार म्हणाले.