मोदी साहेबांनी 9 वर्षात काय केलं? शरद पवारांचा खोचक सवाल
आज जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा पार पडली. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या 9 वर्षांपासून सत्तेत आहेत. भाजप 9 वर्षांपासून सत्तेत आहे. पण भाजपने काय केलं? असा सवाल शरद पवार यांनी केला आहे.
नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना शरद पवार म्हणाले, ' मोदी साहेबंनी काय केलं? ९ वर्ष झालं. राष्ट्रीय पक्ष फोडले. शिवसेना-राष्ट्रवादी फोडली. सीबीआय, ईडी सारख्या यंत्रणा मागे लावल्या. अनेकांना तुरुंगात टाकण्याचं काम केलं. भाजपने सत्तेचा गैरवापर केला. मोदींना विनंती आहे की, चुकीचं काम केलं असेल, त्यांची चौकशी करा. खोटे आरोप करू नका,अशी टीका देखील शरद पवारांनी केली.
जालन्यात लाठीहल्ला केला. त्या लाठीहल्ल्याला काही कारण नव्हतं. त्याचा परिणाम महाराष्ट्रात बघायला मिळाला. शेतकरी, आया-बहिणींवर हल्ला करण्याची प्रवृत्ती ज्यांची असेल त्यांचा पराभव करु, हा निकाल आपल्याला सगळ्यांना घ्यायचा आहे”, असं आवाहन शरद पवारांनी केलं.