Sanjay Raut : 'फडणवीसांचा महापौर होऊ नये यासाठी शिंदे- शाहांचा प्रयत्न', संजय राऊतांची टीका

Sanjay Raut : 'फडणवीसांचा महापौर होऊ नये यासाठी शिंदे- शाहांचा प्रयत्न', संजय राऊतांची टीका

शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर जोरदार टीका करत खळबळजनक आरोप केले आहेत.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

मुंबई महापालिकेतील महापौर पदावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर जोरदार टीका करत खळबळजनक आरोप केले आहेत. महापौर पदाच्या शर्यतीत महायुतीतील अंतर्गत संघर्ष उघड होत असल्याचा दावा करत राऊत म्हणाले, “कोणत्याही परिस्थितीत शिंदे गटाचा महापौर होणार नाही.”

संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधताना म्हटले की, “मुंबईत महापौर कोण होणार, हे मुंबईत नाही तर दिल्लीत ठरवले जात आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मुंबईकरांचा कौल डावलून बाहेरून निर्णय लादले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. महायुतीतील तणावावर भाष्य करताना राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांचा महापौर होऊ नये, यासाठी एकनाथ शिंदे आणि अमित शाह प्रयत्न करत आहेत.” या वक्तव्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

महायुतीतील सत्तासंघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे संकेत या वक्तव्यांतून मिळत आहेत. भाजपवर टीका करताना राऊतांनी आक्रमक भाषा वापरली. “जर भाजपचा महापौर मुंबईत बसला, तर ही मुंबई शोकसागरात बुडेल,” असे म्हणत त्यांनी भाजपच्या नेतृत्वावर आणि धोरणांवर तीव्र शब्दांत टीका केली. मुंबईच्या राजकीय आणि सांस्कृतिक परंपरेवर भाजपचा महापौर आघात करेल, असा आरोप त्यांनी केला. राऊत यांनी मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या दीर्घकालीन परंपरेचा उल्लेख करत सांगितले की, “मुंबई महानगरपालिकेवर सलग अनेक वर्षे शिवसेनेचा महापौर होता. ही परंपरा सहज मोडली जाणार नाही.” मुंबईकरांचा जनादेश हा शिवसेनेच्या बाजूने असल्याचा दावाही त्यांनी केला.

महायुतीत स्पष्ट बहुमत असतानाही महापौर पदावरून सुरू असलेली रस्सीखेच ही केवळ सत्तेची नव्हे, तर अहंकाराची लढाई असल्याचे राऊत म्हणाले. सध्या चार-पाच नगरसेवकांचा फरक असल्याने पुढील काही दिवसांत मोठे राजकीय घडामोडी घडू शकतात, असेही त्यांनी सूचित केले. एकूणच, संजय राऊतांच्या या वक्तव्यांमुळे मुंबई महापालिकेतील महापौर पदाची लढत आणखी चिघळली आहे. पुढील काही दिवसांत वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com