Nana Patole
Nana PatoleTeam Lokshahi

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यास शिंदे फडणवीस सरकारची टाळाटाळ: नाना पटोले

शिंदे-फडणवीस सरकारच्या शेतकरी हिताच्या केवळ कोरड्या गप्पा
Published by :
shweta walge

राज्यातील शेतकरी नैसर्गिक संकटाने पुरता खचलेला असताना त्याला मदत देण्याबाबत शिंदे-फडणवीस सरकार फारसे इच्छुक दिसत नाही. अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतपीके वाया गेली आहेत. हे सरकारला दिसत नाही का? दिवाळीच्या तोंडावर सरकार शेतकऱ्यांना मदतीचा हात देईल अशी अपेक्षा होती परंतु शिंदे- फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्याबाबतीत असंवेदनशील व शेतकरीविरोधी असल्याने ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

शिंदे-फडणवीस सरकारचा समाचार घेताना नाना पटोले म्हणाले की, मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय अपेक्षित होते. अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना राज्य सरकार तात्काळ मदत देऊन दिवाळी गोड करेल अशी अपेक्षा होती. परंतु शिंदे-फडणवीस सरकार हे शेतकरी हिताच्या केवळ पोकळ गप्पा मारत आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी काँग्रेसह इतर पक्षांनीही केलेली आहे. परंतु या सरकारला शेतकऱ्यांचे नुकसान, शेतकऱ्यांचे दुःख, त्याचे अश्रू दिसतच नाहीत. गुजरात हिताला प्राधान्य देणाऱ्या ईडी सरकारने राज्यातील बळीराजाला वाऱ्यावर सोडून शेतकऱ्यांची दिवाळी अंधकारमय केली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या घोषणा या महाविकास आघाडी सरकारने घेतलेलेच निर्णय आहेत, त्यात नवीन काय आहे? ५० हजार रुपये प्रोत्साहनपर देण्याच्या निर्णयाची अंमलबाजवणीही मविआ सरकार असताना झाली होती. युद्धपातळीवर पंचनामे करा असे निर्देश देण्याची वेळ सरकारवर का येते? जे कर्मचारी, अधिकारी पंचनामे करण्यात हयगय करतात त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, पण शिंदे-फडणवीसांच्या राज्यात शासन व प्रशासन दोन्हीही ढिम्म आहे अस म्हणाले.

पुढे ते म्हणाले, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही हे कृषीमंत्र्यांचे वक्तव्य अत्यंत बेजबाबदार व असंवेदनशील आहे. मराठवाड्यातील शेताच्या बांधावर कृषीमंत्री गेले तर ओला दुष्काळाची परिस्थिती आहे का नाही हे त्यांना कळेल. शेतजमीन दिसत नाही, बघावे तिथपर्यंत पाणीच पाणी साचले आहे. शेतात तळी निर्माण झाली आहेत, पिकांचे नुकसान तर प्रचंड झालेले आहे, असे असतानाही कृषीमंत्री जे विधान करतात यावरून त्यांना शेती, शेतकरी व शेतीसंदर्भात काहीही माहिती नाही असा कृषीमंत्री महाराष्ट्राला लाभला हे आपले दुर्भाग्यच आहे, असेही पटोले म्हणाले.

Nana Patole
'वरळीच्या आमदारांना पेग, पेंग्विन अन् पार्टीशिवाय काहीच दिसत नाही'
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com