५० खोके घेतल्याचा आरोप अजित पवार, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरेंना भोवणार का?; शिंदे गटाने घेतला मोठा निर्णय

५० खोके घेतल्याचा आरोप अजित पवार, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरेंना भोवणार का?; शिंदे गटाने घेतला मोठा निर्णय

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यभर सत्तारांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यभर सत्तारांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. अब्दुल सत्तार यांनी माफी मागावी, तसंच त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शिंदे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेना(शिंदे गट) प्रवक्ते विजय शिवतारे यांनी प्रसारमाध्यमांसमोर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर ५० खोके घेतल्याचा आरोप करणाऱ्यांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, “खोके आणि बोके अजित पवारही म्हणत आहेत, सुप्रिया सुळेही म्हणत आहेत आणि आदित्य ठाकरेही म्हणत आहेत, या तिघांनाही नोटीसा पाठवल्या जातील. एकतर तुम्ही दिशाभूल करणारी वक्तव्य केल्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागा नाहीतर मानहानीच्या खटल्याला सामोरं जा. तुम्ही जे ५० खोके घेतल्याचा आरोप करत आहात, त्याचे सर्व पुरावे न्यायालयात सादर करावेत. निश्चतपणे खरं काय आणि खोटं काय हे स्पष्ट होईल.”

यासोबतच “काल सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की, जर माझ्यावर कोणी असे आरोप केले असते तर मी त्याला नोटीस दिली असती. मी त्याच्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला असता, मानहानीचा खटला केला असता. सुप्रिया सुळेंचा हा सल्ला आम्ही ऐकलेला आहे. माझी बऱ्याच आमदारांशी आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. जर इतक्या ताकदीने महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी जे हिंदुत्वाचं नैसर्गिक सरकार बनलेलं आहे, त्याला जर अशाप्रकारे दोष दिले जात असतील आणि त्याची बदनामी केली जात असेल तर निश्चितपणे ५० आमदारांच्यावतीने प्रत्येकी ५० कोटी असे २ हजार ५०० कोटींचे अब्रुनुकसानीचे दावे, मानहानीचे खटले, उद्या त्याची प्रक्रिया सुरू होत आहे, नोटीसा दिल्या जातील.” असे विजय शिवतारे म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com