Pune : जैन बोर्डिंग प्रकरणात शिंदे ॲक्शन मोडमध्ये, धंगेकरांना दिला ‘महायुती एकजटी’चा सल्ला
थोडक्यात
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे.
शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली
27 ऑक्टोबर 2025 पासून जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली असून, 27 ऑक्टोबर 2025 पासून जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचाही या जमिन व्यवहारात सहभाग असल्याचा आरोप करून महायुतीच्या अडचणींमध्ये भर घातली आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धंगेकर यांच्याशी संवाद साधत त्यांना महत्त्वाचा संदेश दिला आहे. पुण्याच्या दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले, “मी धंगेकरांना सांगितले आहे की महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही. विरोधकांना कोणतेही कोलित द्यायचे नाही.” त्यांनी स्पष्ट केले की धंगेकर यांच्या हातात आलेल्या माहितीनुसार ते बोलले, पण आता हा विषय संपलेला आहे.
शिंदे यांनी धंगेकरांचे कौतुकही केले. “रविंद्र धंगेकर हे लढाऊ स्वभावाचे कार्यकर्ते आहेत. ते अन्यायाविरोधात उभे राहतात. त्यांची भाजपाविरोधात भूमिका नाही,” असे शिंदे म्हणाले. तसेच जैन बोर्डिंग प्रकरण लवकरच निकाली निघेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
स्थानीय स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाला मोठे राजकीय वजन आले आहे. धंगेकरांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यामुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला असला, तरी सरकारने सध्या ‘तणाव शमवा’ धोरण अवलंबले असल्याचे चित्र आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात नेमका कोणता निर्णय होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

