Shinde Sena vs MNS Special Report : शिंदे-राज ठाकरेंची युती?; काय घडलं, काय बिघडलं?, जाणून घ्या..
गेल्या काही दिवसांत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या एकीबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. हे तर झालं हल्लीचं, मात्र त्याआधी एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीबाबत कुजबुज सुरू झाली होती. एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्या भेटीगाठीही झाल्या होत्या. मात्र त्या चर्चा नंतर बंद झाल्या. म्हणूनच, या युतीच्या चर्चा का थंडावल्या?, हे सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट वाचूयात...
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकीच्या चर्चांनी सध्या जोर धरलाय. आधी राज ठाकरेंनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरेंना साद घातली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही प्रतिसाद देत एक पाऊल पुढे टाकलं. त्यानंतर या चर्चांना बळ आलं. दोन्ही बाजूंच्या नेत्यांनीही त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिलाय, मात्र या चर्चा सुरू होण्याआधीच मनसे आणि एकनाथ शिंदे यांचे शिवसेना या दोन्ही पक्षात युती होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
त्यातच मंत्री उदय सामंत यांनीही तीन ते चार वेळा राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. तर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील एकदा स्नेहभोजनाच्या निमित्ताने थेट राज ठाकरे यांच्या घरी गेले होते. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि मनसेची युती होईल असं चित्र निर्माण झालं होतं. पण सध्या या सर्व चर्चा थांबल्या आहेत. उदय सामंत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची अनेकदा भेट घेतली असली तरी राज ठाकरे यांनी हिरवा कंदील दिला नव्हता. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनात नेमकं काय आहे याची राजकीय चर्चा सुरू होती.
काय घडलं, काय बिघडलं?
राज यांनी महायुतीला लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला
मात्र माहीम विधानसभेत अमित ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदेंचा उमेदवार
विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरे यांचा पराभव झाला
एकनाथ शिंदे महायुतीतून निवडणुका लढणार, हे जवळपास निश्चित
कुणासोबत जायचं? याबाबत राज ठाकरे काय तो निर्णय घेतीलच, पण उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांमध्ये सध्या गोडव्याचं वारं वाहतंय... पण कोण कुणासोबत जाणार? याची दिशा मात्र अद्याप अस्पष्टच आहे.