Eknath Shinde : शिंदेंची भाजपवर अप्रत्यक्ष टीकास्त्रवृष्टी; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे ?
कल्याण-डोंबिवली तसेच राज्यभरात सुरू असलेल्या “फोडाफोडी”च्या घडामोडींवरून निर्माण झालेल्या नाराजीनाट्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर पहिल्यांदाच भाजपवर नाव न घेता थेट प्रहार केला आहे. डहाणू नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपविरुद्ध उभ्या राहिलेल्या सर्वपक्षीय उमेदवाराच्या प्रचारसभेत शिंदेंनी केलेले भाषण राजकीय वर्तुळात मोठी चर्चा निर्माण करत आहे.
“अहंकाराविरोधात एकत्र आलोय” शिंदेंची थेट हाक
डहाणूतील सभेत बोलताना शिंदे म्हणाले, “आपण इथे अहंकाराविरोधात एकत्र आलो आहोत. अहंकारामुळेच रावणाची लंका जळून खाक झाली होती. २ डिसेंबरला तुम्हीही तसाच धडा शिकवण्याची वेळ आहे.” भाजपचे नाव न घेताही त्यांचा निशाणा स्पष्टपणे समोर आला.
सर्वपक्षीय मोट भाजपच्या उमेदवाराविरोधात
या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरले आहेत. मात्र ठाकरेशिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही उमेदवारांनी माघार घेतल्यानं डहाणूत “भाजप विरुद्ध शिंदे गट” असा थेट सामना उभा राहिला आहे. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते आणि डावे गटही शिंदे समर्थित उमेदवाराच्या बाजूने उभे राहिल्याचं चित्र आहे.
“लाडक्या बहिणींचा चमत्कार आम्ही पाहिलाय” महिलांना थेट आवाहन
मतदारांमध्ये विशेषतः महिला मतदारांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले, “लाडक्या बहिणींची ताकद आम्ही विधानसभेत पाहिलीय. तुम्ही ठरवलं, तर कुणीही आमचा विजय रोखू शकत नाही.”
भाजप–शिवसेना तणाव पुन्हा चर्चेत
कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि आता पालघर तीनही ठिकाणी भाजपने शिंदे गटातील काही पदाधिकाऱ्यांना तोडल्याची नाराजी शिंदे गटात उघडपणे व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी शिंदेंनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन आपली तक्रार मांडल्याचे समजते. मात्र नाराजी अद्यापही दूर झालेली नाही, असे शिंदेंच्या देहबोलीतून दिसत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
धाराशिवमध्येही तणावाची पुनरावृत्ती
धाराशिवमधील एका विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असतानाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांची भेट टाळल्याची चर्चा आहे.
कल्याणनंतर धाराशिवमध्येही दिसलेले हे तणावपूर्ण दृश्य महायुतीतील वातावरण अधिकच गढूळ करत आहे.
पाटण्यातील कार्यक्रमातही ‘दुरावा’
नितीशकुमारांच्या शपथविधीला उपस्थित असताना शिंदेंचा आणि फडणवीसांचा परस्परांतील अवघडलेला संवाद विशेष लक्षवेधी ठरला. फडणवीसांनी स्मितहास्य देत नमस्कार केला, मात्र शिंदेंनी फक्त हात जोडून कमीत कमी औपचारिकता पार पाडली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
राजकीय प्रश्न : शिंदे-भाजप समीकरण कुठे जाणार?
डहाणूतून शिंदेंनी केलेला “अहंकाराचा” संदर्भ आणि सर्वपक्षीय मोटीचा थेट राजकीय अर्थ काढत राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे. पालघर-जिल्ह्यातील ही लढत महायुतीतील अंतर्गत ताणतणावाला आणखी ठळक करतेय. आता भाजप यावर कशी प्रतिक्रिया देणार, आणि पुढची राजकीय हालचाल कोणती याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
