गजानन किर्तीकर यांची त्वरीत शिवसेनेतून हकालपट्टी करावी; शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी
शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी शिवसेना पक्षाचे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून गजानन किर्तीकर यांची त्वरीत शिवसेनेतून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. शिशिर शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे की, ज्येष्ठ नेते श्री. गजानन कीर्तिकर यांची त्वरित शिवसेनेतून हकालपट्ट करावी ही आग्रहाची विनंती. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्री. गजानन कीर्तिकर यांचा अनुभव व ७८ वर्षांचे वर पाहून आपण त्यांचा अत्यंत योग्य सन्मान राखला. त्यांना व्यासपीठावर आपल्य बाजूचे आसन कायम दिले. लोकसभेसाठी श्री. गजानन कीर्तिकर यांचे पुत्र श्री अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी अधिकृतपणे उबाठा पक्षातर्फे जाहीर झाली आणि गजाभाऊ आकंठ पुत्रप्रेमाने अक्षरशः आंधळे झाले. गेली सुमारे वर्षभर गजाभाऊ त्यांचा सर्व शासकीय निधी व यंत्रणा अमोल कीर्तिकर यांच्या सल्ल्याने व पुढाकाराने विनियोग करत होते. एकाच कार्यालयात बसून कीर्तिकर पितापुत्र पक्ष चालवत होते. त्यात शिवसेनेला शन्य लाभ होता मात्र उबाठाला प्रत्यक्षात फायदा होत होता.
काल ऐन मतदानाच्या दिवशी गजाभाऊंच्या पत्नीने तुमचा एकेरी उल्लेख करत जाणूनबुजून अपमान करत त्वेषाने प्रतिस्पर्धी उबाठाची बाजू घेतली. गजाभाऊ मूक साक्षीदार बनले होते. आज गजाभाऊ कीर्तिकरांनी पुत्रप्रेमाचे ओंगळवाणे राजकीय प्रदर्शन करत तुमची निंदा नालस्ती केली. गजाभाऊ आपल्या पक्षातून बाहेर पडून मातोश्रीचे "लाचार श्री" व्हायचा प्रयत्न करीत आहेत. यापूर्वी ज्येष्ठ शिवसेना नेते श्री. रामदास कदम यांचेशी जाहीर भांडण केले. कर्तृत्ववान सिध्देश कदम याचे पंख कापण्याचे काम गजानन कीर्तिकरांनी केलेले आहे.
एकूणच कीर्तिकरांना मातोश्रीवर लोटांगण घालायची घाई झालेली दिसते. पण कीर्तिकरांचे हे उद्योग आपल्या पक्षाला व मुख्य नेते म्हणून आपल्याला बदनाम करत आहेत. आता बस्स ! शिंदेसाहेब, श्री. गजानन कीर्तिकर यांची पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल पक्षातून त्वरित हकालपट्टी करावी. त्यांना निरोपाचा नारळ द्यावा ही आग्रहाची विनंती. धन्यवाद ! असे शिशिर शिंदे म्हणाले.